अग्निशमनची धुरा सफाई कामगारांवर
By admin | Published: February 1, 2016 01:47 AM2016-02-01T01:47:57+5:302016-02-01T01:47:57+5:30
सिडकोप्रमाणे पनवेल नगरपालिकेचेही अग्निशमन विभागाकडे दुर्लक्ष सुरू आहे. अग्निशमन दलाकडे फक्त दोनच वाहने असून एका वाहनाचा वापर परवानाच संपला आहे.
नामदेव मोरे, नवी मुंबई
सिडकोप्रमाणे पनवेल नगरपालिकेचेही अग्निशमन विभागाकडे दुर्लक्ष सुरू आहे. अग्निशमन दलाकडे फक्त दोनच वाहने असून एका वाहनाचा वापर परवानाच संपला आहे. तीनच प्रशिक्षित कर्मचारी असून आग विझविण्यापासून सर्व कामे सफाई कामगारांनाच करावी लागत आहेत. आग विझविण्यासाठी सिडको व नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलावर अवलंबून राहावे लागत आहे.
राज्यामधील सर्वात जुन्या नगरपालिकांमध्ये पनवेलचा समावेश होतो. नगरपालिकेला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. पूर्वी जुने वाडे व बैठ्या घरांच्या जागेवर आता ४ ते ७ माळ्यांच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. इमारतीची उंची वाढली असली तरी शहरात आग लागल्यास ती विझविण्यासाठी सक्षम यंत्रणाच तयार करण्यात आली नाही. नगरपालिका मुख्यालयासमोर झोपडीसारख्या खोलीत अग्निशमन दलाचे कार्यालय आहे. यामधील अर्धा भाग बांधकाम विभागासाठी व एक टेबल व तीन खुर्च्या बसतील एवढ्याच जागेत अग्निशमन केंद्राचे कार्यालय आहे. दीड शतकाच्या वाटचालीनंतर नगरपालिकेच्या ताफ्यात फक्त दोन आग विझविणारी वाहने आहेत. यामधील एक फायर इंजीन खूप जुने झाले असून त्याचा वापर परवानाच संपला आहे. एका छोट्या वाहनावर पूर्ण शहराची सुरक्षा अवलंबून आहे. शहरामध्ये मोठी आग लागली तर नगरपालिकेचे अग्निशमन दल ते विझवू शकत नाही. छोटी आग, साप पकडणे, अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करण्याचे काम या कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. चुकून मोठी आग लागली तर नवी मुंबई महानगरपालिका, सिडकोच्या कळंबोली व नवीन पनवेल अग्निशमन दलावर विसंबून राहावे लागत आहे.
अग्निशमन दलामध्ये प्रशिक्षित कर्मचारीच नाहीत. सद्यस्थितीमध्ये अग्निशमन अधिकारी संतोष बेर्डे, अनिल जाधव व महेंद्र गायकवाड हे तीनच प्रशिक्षित कर्मचारी आहेत. आग कशी विझवायची, काय खबरदारी घ्यायची याविषयीचे रीतसर प्रशिक्षण या तिघांनी घेतले आहे. अग्निशमन दलामध्ये जवानांचे काम सफाई कामगारांना देण्यात आले आहे. सफाई कामगार आग विझविण्यापासून सर्व प्रकारची कामे करत आहेत. या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेने अद्याप योग्य प्रशिक्षणही दिलेले नाही. या सर्वांना आवश्यक त्या सुविधाही नाहीत. आग विझविताना अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे अग्निशमन दलामधील कर्मचाऱ्यांना विमा काढणे अत्यंत आवश्यक असते. परंतु सफाई कामगारांचा विमाही काढण्यात आलेला नाही. अग्निशमन दलाचे कार्यालय खुराड्याप्रमाणे आहे. तेथे जवानांना बसण्यासाठीही जागा नाही. तीन कर्मचारी खुर्चीवर बसू शकतात. उर्वरित कर्मचाऱ्यांना जमिनीवरच बसावे लागत आहे. पनवेलसारख्या आधुनिक शहरामध्येही अग्निशमन दलाची झालेली दुरवस्था व कर्मचाऱ्यांची गैरसोय पाहून शहरवासीयांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडली व त्यामध्ये मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. अग्निशमन दल सक्षम नसल्याने शहरवासीयांची सुरक्षा धोक्यात आहेच. याशिवाय अग्निशमन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षाही धोक्यात आहे. त्यांना अत्याधुनिक उपकरणे देण्यात आलेली नाहीत. बसण्यासाठी चांगले कार्यालय नाही. सफाई कामगारांकडून अग्निशमन विभागाचे काम करून घेतले जात आहे. त्यांना योग्य प्रशिक्षणही देण्यात आले नाही.