उरण : शहरातील कोटानाका पेट्रोलपंप शेजारीच उभारण्यात आलेल्या अनधिकृत फर्निचरच्या दुकानांना अचानक आग लागली. दुपारी लागलेल्या या आगीत चार फर्निचारची दुकाने भस्मसात झाली आहेत. अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे जीवीतहानी आणि जवळच पेट्रोल पंप असल्याने होणारी दुर्घटनाही टळली. या घटनेची तक्रार करण्यास अद्याप तरी कुणीही पुढे आला नसल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. उरण शहरानजीकच्या पनवेल-उरण मार्गावर सगीर ब्रदर्सचे पेट्रोल पंप आहे. या पेट्रोलपंपाला लागूनच रस्त्याच्या कडेला अनेक अनधिकृत दुकाने उभारण्यात आली आहेत. यामध्ये जुन्या लाकडाच्या फर्निचर आणि काही भंगारच्या दुकानांचा समावेश आहे. सिडको, महसूल आणि पोलिसांच्या आशीर्वादाने उभारण्यात आलेल्या फर्निचरच्या दुकानाला रविवारी दुपारी आग लागली. आगीच्या भक्ष्यस्थानी फर्निचरची जुनी, नवी लाकडे पडल्याने आग आणखीनच पसरली. आगीमुळे शेजारील दुकानांचेही नुकसान झाले. पोलिसांना खबर मिळताच घटनास्थळी धाव घेत अग्नीशमन दलाला पाचारण केले. सिडको एमएसईबीच्या अग्नीशमन दलाने तत्काळ आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आल्याने बाजूलाच असलेल्या पेट्रोल पंपापर्यंत आग पोहोचली नाही. मात्र या आगीत जुन्या नव्या फर्निचरची चार दुकाने भस्मसात झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षातून देण्यात आली. मात्र या गंभीर घटनेनंतरही तक्रार करण्यास अद्याप तरी एकही दुकानदार उरण पोलीस ठाण्यात आला नसल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळाली.
उरणमधील आगीत चार दुकाने भस्मसात
By admin | Published: January 23, 2017 5:43 AM