लाकडाच्या चार वखारींना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 02:02 AM2021-03-06T02:02:21+5:302021-03-06T02:02:33+5:30
घणसोलीत सिलिंडरचा स्फोट
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : घणसोली सेक्टर २५, दत्तनगर येथे असलेल्या लाकडाच्या तीन ते चार वखारींमध्ये एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास घडली. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली. यात एका कंपनीतील लाखो रुपयांचा मुद्देमाल खाक झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना येथील आग आटोक्यात आणण्यास तब्बल दोन तास लागले. आगीचे नेमके कारण मात्र अस्पष्ट असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.
घणसोली सेक्टर २५, दत्तनगर येथील भूखंड क्र. १४७, १४८, १४९, १५० आणि १५१ मध्ये लाकडाच्या वखारी आहेत. या ठिकाणी वखारीत काम करणारे मजूर कुटुंब राहतात. अचानक झोपड्यातील एका लहान सिलिंडरने पेट घेतल्याने या आगीची झळ शेजारील भूखंडालगतच्या केबलला लागल्याने आग वाढली. या आगीत भूखंड क्र. १४७ मधील कंपनीच्या मालक माला झा यांच्या कागद आणि प्लास्टिक स्टिकर बनविण्याचा १० ते १५ लाख रुपयांचा कच्चामाल आगीत खाक झाला. आगीचे वृत्त कळताच माजी आमदार संदीप नाईक, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, मोनिका पाटील, हरिश्चंद्र वाघमारे, तसेच समाजसेवक किरण म्हात्रे यांनी सदर घटनेची पाहणी केली.
या आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या तीन आणि रबाळे एमआयडीसीची एक अशा एकूण चार अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन तासांच्या आत आग आटोक्यात आणली.
जीवितहानी टळली
nआगीत दोन मजुरांचे संसार जळून खाक झाल्यामुळे त्यांना रस्त्यावर यावे लागले. गावी जाण्यासाठी जमा केलेले १० ते १५ हजार रुपये जळून गेले.
nआगीचे वृत्त कळताच शेजारील झोपडपट्टी वस्तीवरील अनेक कुटुंबे जीव वाचविण्यासाठी पळत होती.
nभूखंड क्र. १४७ वरील मोबाइल टॉवर या भीषण आगीपासून सुरक्षित राहिल्यामुळे जीवितहानी टळली. अनेक कामगार येथे काम करीत होते.