नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १३ मध्ये गुरूवारी मध्यरात्री भीषण आग लागली. आगीमध्ये भंगार गोडावून मंडप साहित्याचे गोडावून व गॅरेज जळून खाक झाले. लाखो रूपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे.
येथील प्लॉट नंबर ३१ व ३२ च्या समोर असलेल्या गोडावूनमध्ये मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीमध्ये भंगार साहित्याचे गोडावून पूर्णपणे जळून खाक झाले आहे. गोडावूनमध्ये भंगार साहित्य मोठ्या प्रमाणात रद्दी होती. मध्यभागी असलेल्या गॅरेजमधील अनेक वाहने जळाली. कर्मचाऱ्यांनी काही मोटारसायकल बाहेर काढण्यात यश मिळविले. गॅरेजच्या बाजूला असलेल्या मंडप साहित्या गोडावूनमधील साहित्यही जळून खाक झाले. तीन गोडावूनला लागून असलेल्या बांधकामाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे वृत्त समजताच नेरूळ व वाशी अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यास सुरुवात केली. सकाळीही भंगार गोडावूनमधून धूर येत होता. वाऱ्यामुळे शिल्लक रद्दी पेट घेत होती.
आग लागल्याचे समजताच महावितरण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी धनाजी देसले, सिद्धनाथ पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून परिसरातील विजपुरवठा बंद केला. यामुळे आग लागून असलेल्या कंपन्यांमध्ये पसरली नाही. आग विझविण्याचे कामही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना करता आले. दिवसभर आगीमध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते. आग नक्की कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.