फेकलेल्या बॅगेमुळे लोकलच्या पेंटाग्राफला आग; अज्ञातावर गुन्हा दाखल; आरोपीचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 01:24 AM2019-10-10T01:24:55+5:302019-10-10T01:25:07+5:30
मुंबईहून पनवेलला जाणाऱ्या लोकलच्या पेंटाग्राफला ही आग लागली.
मुंबई/नवी मुंबई : धावत्या लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. ही लोकल वाशी स्थानकात आली असता, रेल्वे पोलिसांनी तत्काळ आग विझविण्याचे प्रयत्न केले. यामुळे संभाव्य धोका टळल्यानंतर सुमारे १५ मिनिटांनी ही लोकल कारशेडला पाठविण्यात आली. अज्ञाताने रेल्वेवर फेकलेल्या ट्रॉली बॅगमुळे ही आग लागल्याची शक्यता असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईहून पनवेलला जाणाऱ्या लोकलच्या पेंटाग्राफला ही आग लागली. प्रवाशांच्या माहितीनुसार, मानखुर्द रेल्वेस्थानकापासून पेंटाग्राफमधून धूर निघत होता. अखेर ९.२० वाजण्याच्या सुमारास लोकल खाडी पुलावरून वाशी स्थानकाच्या दिशेने येत असताना पेंटाग्राफने पेट घेतला. आगीची माहिती मिळताच, वाशी रेल्वेस्थानकात कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांनी अग्निशमन यंत्राद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वेच्या वरच्या भागावर आग असल्याने ती विझविण्यात अडथळा निर्माण होत होता. यामुळे पोलीस शिपाई बाबासाहेब धायतडक यांनी कार्यतत्परता दाखवत ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. अखेर सुमारे दहा मिनिटांच्या प्रयत्नात आग आटोक्यात आल्यानंतर ती लोकल सानपाडा येथील कारशेडमध्ये पाठविण्यात आली. आग विझविल्यानंतर पेंटाग्राफच्या ठिकाणी ट्रॉली बॅगचा हँडल आढळून आला, तर बॅग पूर्णपणे जळून राख झालेली होती. त्यावरून अज्ञाताने रेल्वेवर बॅग फेकल्याने हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. अज्ञाताविरोधात वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर सस्ते यांनी सांगितले, तसेच त्यांचा शोध घेतला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
- वाशी स्थानकात अज्ञात व्यक्तीकडून पेंटाग्राफवर बॅग फेकली. त्यामुळे पेंटाग्राफ आणि ओव्हर हेड वायर यांच्या संपर्कात अडथळा आल्याने आग लागली. रेल्वे सुरक्षा बल, महाराष्ट्र सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, रेल्वे प्रशासन यांनी अग्निशमन यंत्राद्वारे आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, लोकलला आग लागण्याच्या घटनेमुळे वेळापत्रक बिघडले.