शहरात दुर्घटना घडते तेव्हाच येते महापालिकेला जाग, आग प्रतिबंधक यंत्रणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 03:02 AM2019-05-05T03:02:03+5:302019-05-05T03:02:14+5:30
माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून नावलौकिक प्राप्त झालेल्या नवी मुंबईकरांत आग सुरक्षेबाबत कमालीची उदासीनता असल्याचे दिसून आले आहे.
नवी मुंबई - माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून नावलौकिक प्राप्त झालेल्या नवी मुंबईकरांत आग सुरक्षेबाबत कमालीची उदासीनता असल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांत नियमाने बंधनकारक असलेली आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित केली नसल्याचे समोर आले आहे. अशा गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेच्या वतीने वारंवार नोटिसा बजावल्या जातात. मात्र, सोसायट्यांकडून या नोटिसांना केराची टोपली दाखविली जाते. विशेष म्हणजे, आगीची एखादी दुर्घटना घडली की, महापालिकेला या संदर्भात पुन्हा जाग येते. त्यानंतर पुन्हा नोटिसा बजावण्याचा सोपस्कार पूर्ण केला जातो. ठोस कार्यवाहीला बगल देत दोन्ही घटकांकडून आपली जबाबदारी आणि कर्तव्यात कसूर केली जात असल्याने शहरात आग प्रतिबंधक यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे.
गेल्या आठवड्यात ऐरोली येथील एका बहुमजली इमारतीच्या बाविसाव्या मजल्यावरील घराला आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे, या इमारतीतही आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेनंतर महापालिका पुन्हा खडबडून जागी झाली आहे. आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसलेल्या गृहनिर्माण सोसायट्या आणि वाणिज्य संकुलांना आवाहन केले आहे. आगप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या इमारतींचा पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे अधिकार महापालिकेला आहेत, असे असतानाही आग प्रतिबंधक यंत्रणेबाबत उदासीनता दाखविणाºया संस्थांच्या विरोधात कारवाई होताना दिसत नाही. एखादी दुर्घटना घडली की, वृत्तपत्रातून जाहीर आवाहन करायचे किंवा पुन्हा संबंधित सोसायट्यांना नोटिसा बजावायच्या, ही महापालिकेची या संदर्भातील कार्यपद्धती बनली आहे.
लघु-उद्योजकांनाही वावडे
महापालिका कार्यक्षेत्रातील लघु-उद्योजकांनाही आग प्रतिबंधक यंत्रणेचे वावडे असल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी अग्निशमन नियमांना हरताळ फासला आहे. विशेषत: एमआयडीसीतील अनेक कंपन्यांत आजही आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे शहरात निवासी व व्यावसायिक असा संमिश्र वापर असलेल्या वसाहतीतही या यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.