पालिका आयुक्तांच्या निवासस्थानात आग, थोडक्यात टळली मोठी दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 12:33 AM2020-11-03T00:33:21+5:302020-11-03T00:33:47+5:30
Fire at the residence of the Municipal Commissioner in Navi Mumbai : सोमवारी दुपारी पालिका आयुक्त पालिका मुख्यालयात असताना ही दुर्घटना घडली.
नवी मुंबई : नेरुळ येथील पालिका आयुक्तांच्या निवासस्थानात आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने त्या ठिकाणी जाऊन आग आटोक्यात आणली. त्या ठिकाणच्या मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचे समोर आले आहे.
सोमवारी दुपारी पालिका आयुक्त पालिका मुख्यालयात असताना ही दुर्घटना घडली. पालिका आयुक्तांच्या निवासस्थानातून धुराचे लोट दिसू लागल्याने, परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, निवासस्थानातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला तत्काळ कळवल्याने नेरुळचे बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आयुक्तांच्या परिवाराला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. निवासस्थानात प्रवेशद्वारावरच असलेल्या मीटर रूममध्ये आग लागली होती. आठवड्यापूर्वीच आयुक्त निवासस्थानाच्या रंगरंगोटीचे काम करण्यात आले आहे, तर विद्युत मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीची माहिती मिळताच तत्काळ वीजपुरवठा खंडित करून व पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली, तर घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. सुदैवाने या आगीमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.