सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : आशिया खंडातली सर्वाधिक मोठी बाजारपेठ असलेले एपीएमसी मार्केट आगीच्या भक्षस्थानी सापडण्याच्या स्थितीमध्ये आहे. बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये सतत आगीच्या घटना घडत असतानाही अग्नी सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, एखादी छोटी आग वेळीच आटोक्यात न आल्यास मोठी दुर्घटना होऊन जीवित तसेच वित्त हानी होऊ शकते.
तुर्भे येथे सुमारे ७२ हेक्टर जमिनीवर कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) उभारण्यात आली आहे. त्यात कांदा बटाटा, मसाला, धान्य, भाजीपाला व फळ या पाच मार्केटचा समावेश आहे. या प्रत्येक मार्केटमध्ये किमान सहा हजार व्यावसायिक गाळे आहेत. शिवाय प्रत्येक मार्केटमध्ये निर्यात भवन व मध्यवर्ती सुविधा केंद्रे आहेत. यामुळे प्रतिदिन त्या ठिकाणी एक लाखाहून अधिक नागरिक व व्यापारी भेट देत असतात. तर हजारोंच्या संख्येने मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची रहदारी सुरू असते. मात्र येथे अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मार्केट आवारात आगीची मोठी दुर्घटना घडू शकते.
एपीएमसी आवारातील बहुतांश गाळ्यांमध्ये पोटमाळे तयार करून मालाचा साठा केला जात आहे. अनेक व्यापाऱ्यांनी गाळ्यांतच छोटे कारखाने सुरू केले आहेत. अशा ठिकाणी आग लागल्यास काही क्षणांत ती परिसरातील इतरही गाळे खाक करू शकते. परंतु बाजार समितीची स्वतःची अग्निशमन यंत्रणा नसल्याने महापालिकेच्या वाशी येथील अग्निशमन दलाला बचावकार्यासाठी जावे लागते.
तसेच, अनेकदा एपीएमसी आवारातील पार्किंगने व्यापलेल्या रस्त्यांवरून मार्ग काढत अग्निशमन दलाच्या गाड्यांना जावे लागते. एखाद्या वेळी बचावकार्यास विलंब झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक गाळ्यावर तसेच मार्केटमध्ये स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना महापालिकेच्या अग्निशमन विभागाने एपीएमसी प्रशासनाला केल्या आहेत. पालिकेच्या या प्रत्येक सूचनेला केराची टोपली दाखवून अग्नी सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात मोठी आग लागण्याची शक्यता आहे.