तळोजा एमआयडीसीत अग्निसुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:36 AM2019-02-16T00:36:44+5:302019-02-16T00:37:18+5:30
गेल्या दोन-तीन वर्षांत तळोजात औद्योगिक वसाहतीतील आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बेकायदा गोदाम, गॅरेज, भंगार गोदामांमुळे औद्योगिक वसाहतीची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
तळोजा : गेल्या दोन-तीन वर्षांत तळोजात औद्योगिक वसाहतीतील आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बेकायदा गोदाम, गॅरेज, भंगार गोदामांमुळे औद्योगिक वसाहतीची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. प्रशासनाची अग्निशमन यंत्रणा तोकडी पडत असल्याचे नुकत्याच घडलेल्या दुर्घटनांमधून समोर येत आहे.
२०१७ मध्ये एकूण ६४ कंपन्यांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या, यातील काही गंभीर होत्या. तर २०१८ मध्ये या ८५ आगीच्या घटना घडल्याची नोंद आहे. यापैकी मेम्बाकेम, कैराव केमिकल्स, हौसीया कोल्डस्टोरेज, फोमहोम या कारखान्यांत गंभीर स्वरूपाच्या आगीच्या घटना घडल्या आहेत. तळोजात औद्योगिक वसाहत सुमारे ९०० हेक्टर जागेत वसलेली असून, यात १२०० प्लॉटवर लहान-मोठे ९१५ कारखाने आहेत. यात बहुतांश रासायनिक कारखाने असून या कंपन्यांमध्ये अग्निसुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना नसल्याचे दिसून येत आहे.
तळोजा औद्योगिक परिसरातील अग्निशमन दलाकडे दोन अग्निशमन बंब असून, दोन अधिकारी व १८ कर्मचारी कार्यरत आहेत. ९१५ कारखान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी अग्निशमनच्या अवघ्या १८ कर्मचाºयांवर आहे, त्यामुळे कंपन्यांमधील अग्निरोधक यंत्रणा तपासणे, आग लागू नये
म्हणून उपाययोजना, जनजागृती होण्यात मनुष्यबळाअभावी मर्यादा येत आहेत.
तळोजा औद्योगिक वसाहतीत कोल्ड स्टोरेज कारखान्यांची संख्याही मोठी आहे, यामध्ये वापरला जाणारा घातक अमोनिया वायुगळतीच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच येथील नाईक ओशिअनिक कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे पाच कामगार जखमी झाले होते.
अन्य यंत्रणांचा आधार
एमआयडीसीतील ९१५ कंपन्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत अग्निशमन यंत्रणा अपुरी पडते. परिणामी, एखादी दुर्घटना घडली की, बाहेरील किंवा खासगी कंपन्यांच्या यंत्रणांची मदत घ्यावी लागते. आगीचे कॉल आल्यानंतर तळोजा औद्योगिक वसाहत सोडून अंबरनाथ, डायघर, दहिसर, डोंबिवली या ठिकाणी यंत्रणा मागवावी लागते.
जीवितहानी
तळोजा औद्योगिक वसाहतीत २०१७ मध्ये ६४ तर २०१८ मध्ये जवळपास ८५ आगीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये चार कामगारांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. तर २०१६ मध्ये टिकिटार या कंपनीतील आगीच्या घटनेत आठ कामगारांचा मृत्यू झाला होता.
फायर आॅडिट अहवालाबाबत अनभिज्ञ
कारखाना सुरू झाल्यानंतर अग्निशमन विभागाकडून दाखला दिला जातो. आणि दरवर्षी कंपनीकडून फायर आॅडिट करणे होणे बंधनकारक असते. मात्र तसे होत नसल्याचे अग्निसुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
एमआयडीसीतील अनेक कंपन्यांकडे तळोजा अग्निशमनचा संपर्कक्रमांकही नाही. रासायनिक कंपन्या, कोल्ड स्टोरेज कंपन्यांनी अग्निसुरक्षेबाबत जागृती असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक कंपन्यांमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजना नाहीत, शिवाय संपर्कक्रमांकही नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगीची घटना घडली की कर्मचारी १०० किंवा १०१ क्रमांकावर संपर्क साधतात. त्यांच्याकडून स्थानिक यंत्रणांना कळवले जाते, त्यामुळे अनेकदा घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत असल्याचे अग्निशमन दलातील कर्मचाºयांकडून सांगण्यात येते.
तळोजा परिसरातील आगीच्या घटना कमी झाल्या आहेत. अग्निसुरक्षेबाबत आम्ही कंपन्यांमध्ये जनजागृती करत आहोत. आगीच्या घटनांचे नेमके कारण काय? व घटना टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत कारखानदारांना नेहमीच मार्गदर्शन केले जाते.
- दीपक दोरु गडे,
अग्निसुरक्षा अधिकारी, तळोजा