अग्निशमनचे कर्मचारीच आपत्कालीन परिस्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 02:37 AM2019-06-24T02:37:34+5:302019-06-24T02:37:52+5:30

शासनाच्या उदासीनतेमुळे वाशी अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासह जीविताला धोका निर्माण झाला आहे.

 Fire staff employees in emergency situations | अग्निशमनचे कर्मचारीच आपत्कालीन परिस्थितीत

अग्निशमनचे कर्मचारीच आपत्कालीन परिस्थितीत

Next

- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वाशी अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासह जीविताला धोका निर्माण झाला आहे. मूळ जागेत अग्निशमन केंद्राच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असल्याने मागील तीन वर्षांपासून तात्पुरत्या जागेत हे केंद्र स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, त्या ठिकाणी गैरसोयींचे भांडार असल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पालिकेतर्फे वाशीतील अग्निशमन केंद्राच्या इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. त्यानुसार मागील तीन वर्षांपासून मोकळ्या जागेत शेडखाली अग्निशमन केंद्राची तात्पुरती सोय करण्यात आलेली आहे. या कालावधीत दोनदा जागा बदलण्यात आली असून, सद्यस्थितीला पोस्ट कार्यालयासमोरील जागेत हे केंद्र चालत आहे. मात्र, त्या ठिकाणी प्रशासनाकडून आवश्यक सुविधा पुरवण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत असून जीवालाही धोका निर्माण झाला आहे. यामुळे आपत्कालीन प्रसंगी नागरिकांच्या मदतीला धाव घेणारे अग्निशमनचे कर्मचारीच आपत्कालीन परिस्थितीत अडकले आहेत. कर्मचाºयांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर बसवण्यात आला आहे. मात्र, त्या ठिकाणी पाणी पिताना तो घोट शेवटचाही ठरू शकतो. कर्मचाºयांना वापराच्या पाण्यासाठी सुमारे दहा फुटांवर बसवण्यात आलेल्या पाण्याच्या टाकी खाली हा प्युरिफायर बसवलेला आहे. तीन महिन्यांपासून सदर टाकीला गळती लागली असून, २४ तास त्यामधून पाण्याचे फवारे सुरू असता, हे पाणी त्या ठिकाणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरवर तसेच उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरवर उडत असते. यामुळे त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी गेलेल्या कर्मचाºयाला शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर वॉटर प्युरिफायरची दोन वर्षांपासून स्वच्छताच झालेली नसल्याचेही कर्मचाºयांचे म्हणने आहे. परिणामी, सर्वच बाजूने कर्मचाºयांवर संकटांची टांगती तलवार लटकत असल्याचे दिसून येत आहे. गतमहिन्यात त्या ठिकाणी एका मनोरुग्ण व्यक्तीचे प्राणही गेले आहेत. नाट्यगृहाला वीजपुरवठा करणारा महावितरणचा विद्युत ट्रान्सफॉर्मर उघड्यावर पडलेला आहे. यामुळे उंचावरील टाकीतून उडणाºया पाण्याच्या फवाºयामुळे आग लागल्यास मोठी दुर्घटना घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
कर्मचाºयांच्या बैठकीसाठी तसेच दैनंदिन कामकाजासाठी कंटेनर केबीन ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एका कंटेनरमध्ये शौचालयाची सोय करण्यात आली आहे. मात्र, त्यातून सांडणारे मलमिश्रीत पाणी परिसरात वाहत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. शिवाय त्यामध्ये वाढणाºया डास व माश्यांमुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
यासंदर्भात कर्मचाºयांनी
तक्रार केली असता, त्यांना भावे नाट्यगृहाचे शौचालय वापरण्यास सांगण्यात आले होते. मात्र, पाच महिन्यांपासून नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने अग्निशमनच्या कर्मचाºयांच्या शौचालयाचीही गैरसोय झाली आहे. त्या ठिकाणी
एका शिपला सुमारे १५ कर्मचारी कर्तव्यावर असतात, त्या
सर्वांना नाइलाजास्तव कंटेनरमधील गळते शौचालयच वापरावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेबाबत कर्मचाºयांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

शेडवर लाखोंचा खर्च

ऊन व पावसापासून सुरक्षेसाठी त्या ठिकाणी संपूर्ण जागेत प्लॅस्टिकचे शेड उभारण्यात आले आहे. त्याकरिता वर्षभरापासून प्रतिमहिना एक लाख रुपये भाडे दिले जात असल्याचे समजते. त्याऐवजी जर पालिकेनेच स्वखर्चातून हे शेड उभारले असते, तर निम्याहून कमी खर्च आला असता; परंतु कर्मचाºयांच्या सोयींकडे दुर्लक्ष करणारे वरिष्ठ अधिकारी इतर खर्चांसाठी मात्र प्रशासनाची तिजोरी खुली करत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

पाणी फवाºयामुळे आगीचा धोका

कर्मचाºयांना वापराच्या पाण्यासाठी सुमारे दहा फूट उंचावर टाकी बसवण्यात आली आहे. तीन महिन्यांपासून या फुटलेल्या टाकीतून पाण्याचे फवारे उडत आहेत.

ते पाणी बाजूच्या महावितरणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरपर्यंत उडत आहे, यामुळे त्या ठिकाणी आगीचा धोका निर्माण झाला असून, तसे घडल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे.

Web Title:  Fire staff employees in emergency situations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.