नवी मुंबई : महावितरणच्या भूमिगत वायरला आग लागल्याची घटना नेरुळमध्ये घडली होती. वेळीच परिसराचा वीजपुरवठा खंडित करून त्या ठिकाणची आग विझविण्यात आली. मात्र, सातत्याने घडत असलेल्या अशा दुर्घटनांमुळे महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.
नेरुळ सेक्टर ४८ ए येथील अय्यपा मंदिर समोरील मार्गावर ही घटना घडली. त्या ठिकाणच्या भूमिगत वायरने अचानक पेट घेतल्याने हलका स्फोट होऊन जमीन उकलली. या वेळी जळालेल्या वायरमधून वीजप्रवाह सुरूच असल्याने जमिनीमधून आगीच्या ज्वाला बाहेर निघत होत्या. यामुळे परिसरातून ये-जा करणाऱ्यांसह लगतच्या रहिवासी भागालाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच परिसरातील रहिवासी मंगेश पाटील, मनोज सोमण आदीनी महावितरणला कळवून परिसराचा वीजपुरवठा बंद केला. त्यानंतर माती व पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे वेळीच आग विझल्याने संभाव्य मोठी दुर्घटना घडली. घटनास्थळाच्या पाहणी वेळी आग लागलेली महावितरणची वायर अवघ्या काही इंचावरच भूमिगत केल्याचे आढळून आले. गतमहिन्यात कोपरखैरणे येथे अशाच प्रकारे भूमिगत वायरला लागलेल्या आगीमुळे स्फोट होऊन महाविद्यालयीन तरुण गंभीर जखमी झाला होता. तर घणसोली येथे दारासमोरच भूमिगत केलेल्या विद्युत वायरीमुळे लहान मुलगी गंभीर भाजली होती. सातत्याने घडत असलेल्या घटनांमुळे यापूर्वी अनेकदा सामाजिक कार्यकर्ते व राजकीय संघटनांनी महावितरणच्या कार्यालयांवर मोर्चेही काढले आहेत. त्यानंतरही जास्त क्षमतेच्या विद्युत वायर भूमिगत करण्याच्या कामात हलगर्जीपणा होताना दिसत आहे. तर अनेक ठिकाणी पदपथांवरच उघड्यावर वायर टाकण्यात आलेल्या आहेत. यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून त्या ठिकाणावरून चालावे लागत आहे.