नवी मुंबई : विनापरवाना फटाका विक्री व निश्चित वेळेव्यतिरिक्त फटाका फोडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. नवी मुंबईत अशा ५१ जणांवर कायद्याचा फटाका फुटला आहे. त्यामध्ये सर्वाधिक कारवाया रबाळे पोलिसठाने हद्दीत झाल्या आहेत.
दिवाळीत वाढते प्रदूषण टाळण्यासाठी फटाके फोडण्यासाठी रात्री ७ ते १० पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली होती. त्या अनुशंघाने नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या. तर फटाके विक्री करण्यासाठी महापालिका व पोलिस यांची परवानगी सक्तीची करण्यात आली होती. त्यानंतरही अनेकजण कोणत्याही परवानगीशिवाय व सुरक्षेची खबरदारी न घेता फटाका विक्री करत होता.
अशांवर कारवाईसाठी पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या सूचनेनुसार स्थानिक पोलिसांकडून गस्त घातली जात होती. त्यामध्ये दिवाळी सणादरम्यान परिमंडळ १ मधून ५१ जणांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये विनापरवाना फटाका विक्री करणारे व निश्चित वेळेव्यतिरिक्त वेळेत फटाके फोडणाऱ्यांचा समावेश आहे. त्यात रबाळे पोलिसठाने हद्दीत सर्वाधिक कारवाया आहेत. यावरून ऐरोली व रबाळे परिसरात सर्वाधिक नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होत आहे.