पनवेल शहरात रस्त्यावर थाटली फटाक्यांची दुकाने;अपघाताचा धोका
By वैभव गायकर | Published: November 11, 2023 06:54 PM2023-11-11T18:54:41+5:302023-11-11T18:55:08+5:30
...यामुळे अपघाताचा धोका तर उद्भवतोच शिवाय कायद्याचे देखील मोठे उल्लंघन समजले जात आहे.
पनवेल : फटाके विक्रीसाठी पालिकेमार्फत विविध शहरात अधिकृत फटाके विक्री बाजरपेठ उपलब्ध करून दिली असताना पनवेल शहरात अनधिकृत फटाके विक्रेत्यांनी रस्त्यावरच फटाक्यांची दुकाने थाटली आहेत. यामुळे अपघाताचा धोका तर उद्भवतोच शिवाय कायद्याचे देखील मोठे उल्लंघन समजले जात आहे.
दिवाळीत आतषबाजीसाठी पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. फटाके विक्री दुकानांना परवानगी देण्यात आली असून शहरातील वेगवेगळ्या भागात फटाका विक्री दुकाने थाटण्यात आली आहेत. फटाका विक्री स्टाॅल परिसरात आतषबाजी करण्यास मनाई करण्यात आली आहे.शिवाय मानवी वस्तीजवळ कोणतेही फटाक्यांचे दुकान असता कामा नये असे असताना शहरात शिवाजी चौक,कर्नाळा सर्कल,नगरपालिका कॉप्लेक्स तसेच शहरात सर्वत्र रहदारीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्रास फटाक्यांची विक्री केली जात आहे.
ज्या ठिकाणी फटाक्यांची विक्री केली जाते त्याठिकाणी अग्निशमन बंब ठेवणे गरजेचे आहे.याकरिताच फटाके विक्री मार्केट जवळ कायमस्वरूपी पाण्याचे टँकर अथवा बंब ठेवले जाते.मात्र पनवेल शहरात मुख्य बाजारपेठेत सुरु असलेल्या खुलेआम फटाके विक्रीवर बंधन ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे.कारवाई होत नसल्याने दरवर्षी खुलेआम फटाके विक्रीच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळत आहे.