- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये साठा असलेल्या रसायनांबाबत स्थानिक अग्निशमन केंद्र अनभिज्ञ असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे तळोजासारख्या दुर्घटनेवेळी अग्निशमन जवानांना जीव धोक्यात घालावा लागला होता.औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये साठा असलेल्या रसायनांची माहिती अग्निशमन केंद्रांकडे उपलब्ध नाही. यामुळे आगीची घटना घडल्यास त्या ठिकाणी बचावकार्य करताना अडथळे येत आहेत. तर आगीत नेमके कोणते रसायन जळत आहे याची माहिती नसल्याने जीव धोक्यात घालावा लागत आहे. अशाच प्रकारातून तळोजा येथील मोदी कंपनीची आग विझविताना विषारी वायूची बाधा होऊन अग्निशमन जवान बाळू देशमुख यांना जीव गमवावा लागला आहे.दरम्यान, कंपनीतील क्लोरिनचे टनेल व पाचशे किलोहून अधिक ब्रोमिनचा साठा आगीत सापडला असता तर तळोजासह लगतच्या परिसराला धोका होता. त्यामध्ये भोपाळ दुर्घटनेची पुनरावृत्ती घडली असती. ते टाळण्यासाठी तळोजा अग्निशमन अधिकारी दीपक दोरगुडे व त्यांच्या जवानांसह मदतीला आलेल्या इतर अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून संभाव्य दुर्घटना टाळली. मात्र कंपनीतल्या घातक रसायनांची पूर्वकल्पना अग्निशमन केंद्राला असती तर बचाव कार्य निर्विघ्न झाले असते. परंतु राज्यातल्या सर्वच औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या चाचणीचे अधिकार औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (डिस्ट) यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडून स्थानिक अग्निशमन केंद्राला कंपन्यांमधील रासायनिक साठ्याबद्दल कल्पना दिली जात नाही. परिणामी, एखाद्या कंपनीत आगीची दुर्घटना घडल्यास, जीव धोक्यात घालून बचावकार्य करावे लागत आहे. तळोजा दुर्घटनेच्या निमित्ताने विभागीय चौकशी केली जाणार आहे. सुधारित कायद्यानुसार औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या चाचणीचे अधिकार ‘डिस्ट’कडे आहेत. त्यामुळे कंपन्यांमधील रासायनिक साठ्याबद्दल अग्निशमन केंद्राकडे माहिती उपलब्ध नसते.- एम. व्ही. ओगले, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, राज्य.