नवी मुंबई : जीव धोक्यात घालून आग विझविण्याचे काम करणाऱ्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या पगाराशी खेळ सुरू आहे. फेब्रुवारी महिन्याची १२ तारीख झाल्यानंतरही अद्याप वेतन झालेले नाही. प्रत्येक महिन्यात हीच स्थिती असून यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कर्जाचे हप्ते वेळेत भरता येत नाहीत. नेहमीच्या प्रशासकीय दिरंगाईविषयी कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलामधील कर्मचारी २४ तास कर्तव्याशी बांधील आहेत. ठाणे बेलापूर औद्योगीक वसाहत, तळोजा औद्योगीक वसाहत व महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील अनेक मोठ्या आगी विझविण्यासाठी जवानांनी जीवाची बाझी लावल्याचे दृष्य अनेकवेळा पहावयास मिळाले आहे. सद्यस्थितीमध्ये वाशी, नेरूळ, सीबीडी, कोपरखैरणे व ऐरोली अग्निशमन केंद्रामध्ये ३८० जवान कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. प्रत्येक महिन्याला ५ तारखेपासून १२ तारखेपर्यंत पगारासाठी वाट पहावी लागत आहे. डिसेंबर महिन्यात १२ तारखेला वेतन मिळाले होते. जानेवारी महिन्यात ६ तारखेपर्यंत वाट पहावी लागली व फेब्रुवारी महिन्यातही १२ तारखेपर्यंत वेतन झालेले नाही.
नवी मुंबई महानगरपालिकेला सातत्याने डबल ए प्लस पथमानांकन मिळाले आहे. राज्यातील श्रीमंत महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईचाही समावेश होतो. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती भक्कम असताना अग्निशमन जवानांना प्रत्येक महिन्याला पगाराची वाट का पहावी लागत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासकीय दिरंगाईचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. वेळेवर वेतन न मिळाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना वेळेत कर्जाचा हप्ता भरता येत नाही.
कर्मचारी सेनेचा पत्रव्यवहार
अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे अशी मागणी श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष राजूसिंग चव्हाण, सुनिल गावीत सरचिटणीस राम चव्हाण यांनी प्रशासन विभागाच्या उपायुक्तांना पत्र दिले आहे. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला वेतन दिले जावे. अग्नीशमन विभागाकरीता स्वतंत्र लिपीकाची तरतूद करावी. कर्मचाऱ्यांची गैरेसाय होऊ नये. वेळेवर वेतन न मिळाल्यामुळे गृहकर्ज, वैयक्तीक कर्जाचे हप्ते वेळेत भरता येत नसल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे.
महिना व झालेले वेतनसप्टेंबर - ५ऑक्टोबर - ६नोव्हेंबर - ४डिसेंबर १२जानेवारी - ६फेब्रुवारी - १२ अद्याप वेतन नाही