पनवेल शहरात राज्यातील पहिले अत्याधुनिक सबस्टेशन, काम अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 01:57 AM2019-08-16T01:57:03+5:302019-08-16T01:58:22+5:30
पनवेल शहरात महाराष्ट्रातील पहिले अत्याधुनिक स्वरूपाचे विद्युत सब स्टेशन महावितरणच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. सध्या या सबस्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
- वैभव गायकर
पनवेल - पनवेल शहरात महाराष्ट्रातील पहिले अत्याधुनिक स्वरूपाचे विद्युत सब स्टेशन महावितरणच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. सध्या या सबस्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच त्याचे उद्घाटन केले जाईल, असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे. दरम्यान, या सबस्टेशनमुळे पनवेल तालुक्यातील अखंडित वीजपुरवठ्याची मागणी पूर्ण होणार आहे.
एका वर्षापूर्वी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पनवेल शहरातील समस्यांसंदर्भात वीजग्राहकांचा जनता दरबार भरवला होता. या वेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणुन दिला होता. या वेळी पनवेल शहरात स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले होते, त्यानुसार नोव्हेंबर २०१८ मध्ये या सबस्टेशनच्या कामाला सुरु वात झाली. सध्याच्या घडीला शहरात तीन फिडरच्या माध्यमातून शहरात वीजपुरवठा होत आहे. नव्या प्रणालीमुळे ही यंत्रणा आठ फिडरच्या माध्यमातून केली जाणार आहे. दहा एमव्हीएम क्षमतेचे दोन ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी लावण्यात येणार असल्याने पुढील दहा वर्षांत तरी विजेचा ताण येणार नाही. याबाबत नियोजन या सबस्टेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे. सध्याच्या घडीला पनवेल शहरातील एका भागातील वीजपुरवठा जरी खंडित झाला तरी तो सुरळीत करण्यासाठी शहरातील सर्वच वीजपुरवठा खंडित करावा लागतो. मात्र, हे सबस्टेशन कार्यान्वित झाल्यास या समस्यांपासून पनवेलकरांची मुक्तता होणार आहे.
पनवेल शहराला वीजपुरवठा करण्यासाठी ओएनजीसी येथील सबस्टेशन वीज वाहून आणली जाते. विजेच्या खांबावरून वाहून आणली जाणारी वीज भूमिगत करण्यात आली आहे. साडेतीन किलोमीटरची विद्युतवाहिनी भूमिगत करून पनवेल उपविभागीय कार्यालयाच्या मागील बाजूस गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन उभारण्यात आले. ओएनजीसी येथून कोळखे, नेरे, पारगाव, कर्नाळा आणि गव्हाण फिडरवर वीजपुरवठा केला जातो. मुख्य लाइनवर बिघाड झाला की पनवेल शहर तसेच ग्रामीण भागात वीज खंडित करावी लागत होती. पनवेल शहरासाठी स्वतंत्र सबस्टेशन तयार झाल्यानंतर इतर फिडर आणि पनवेल शहराचा बिघाड यांचा एकमेकांशी संबंध येणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
सबस्टेशनचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या सबस्टेशनचे उद्घाटन केले जाणार आहे. पनवेल शहराला बसलेल्या अतिवृष्टीमुळे या सबस्टेशनच्या उद्घाटनाला विलंब झाला.
- ममता पांडे,
जनसंपर्क अधिकारी, महावितरण
गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन म्हणजे काय?
गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनाला इतर सबस्टेशनच्या तुलनेत जागा कमी लागते. विशेष म्हणजे, हे पूर्णपणे गॅसवर चालणार सबस्टेशन आहे. गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन हे सुरक्षित असून हाताळणेही सोपे आहे. या सबस्टेशनमध्ये गॅसची पातळी नियमित चेक केली तर अपघाताचा धोकाही नसतो.