लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : आंबा हंगामामध्ये मुहूर्ताच्या पेटीला विशेष महत्त्व असते. प्रत्येक वर्षी नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरमध्ये पहिली पेटी दाखल होत असते. यावर्षी प्रथमच १ नोव्हेंबरला आंब्याची आवक झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे गावातील शेतकऱ्याने सर्वप्रथम आंबा विक्रीसाठी पाठविला आहे. पहिली पेटी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाल्याने यंदा दिवाळीतच जगप्रसिद्ध हापूसची चव चाखता येणार आहे.
जुलै महिन्यातच मोहर
फळांच्या राजाचा हंगाम फेब्रुवारी ते जुलैपर्यंत सुरू असताे. परंतु, काही झाडांना लवकर मोहर येतो व तो आंबा डिसेंबरच्या दरम्यान मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असतो. रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे येथील शेतकरी रूपेश शितप यांच्या बागेतील एक झाडाला जुलै महिन्यातच मोहर आला होता. या मोहराची काळजी घेऊन योग्य औषधांची फवारणी करून जतन केले होते. ऑक्टोबरच्या अखेरीस चार डझन आंबे काढून ते विक्रीसाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाठविले आहेत.
पहिल्यांदाच नोव्हेंबरमध्ये आवक
मुंबई बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच नोव्हेंबरच्या सुरुवातीला आंब्याची आवक झाली आहे. आंब्याचा दर्जा फारसा चांगला नसल्यामुळे त्याला नक्की किती भाव मिळतो याविषयी उत्सुकता आहे. ही आंबा हंगामाची सुरुवात नसली तरी मुहूर्त झाला ही सकारात्मक घटना समजली जात आहे.