नवी मुंबई - अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या स्थायी समितीच्या विशेष बैठकीमध्ये काहीच चर्चा झाली नाही. अधिकाºयांकडून उत्पन्नाचे आकडे समजून घेतल्यानंतर सभा संपविण्यात आल्याने पूर्ण दिवस व्यर्थ गेला.आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी २०१८ - १९ वर्षासाठी ३१५१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक २० फेब्रुवारीला स्थायी समितीमध्ये सादर केले. या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी तब्बल १२ दिवसानंतर ५ ते ८ मार्च दरम्यान विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी जमेच्या बाजूवर चर्चा होणार होती. सभेचे कामकाज दिवसभर चालविणे आवश्यक होते, परंतु सदस्यांनी सुरुवातीला प्रत्येक विभागवार किती जमा होणार आहे याचे तपशील विभाग प्रमुखांना सादर करण्यास सांगितले.मुख्य लेखा व वित्त अधिका-यांसह शहर अभियंता व आरोग्य विभागापर्यंत सर्व विभागप्रमुखांनी आर्थिक वर्षामध्ये किती रक्कम जमा होणार याची माहिती सादर करण्यास सांगितले. अधिकाºयांनीही अंदाजपत्रकामध्ये दिलेली रक्कम वाचून दाखविली. यावर काही किरकोळ प्रश्न उपस्थित करण्यात आले. दोन तास सर्व विभागनिहाय माहिती मागविल्यानंतर सभेचे कामकाज संपविण्यात आले. वास्तविक अर्थसंकल्पावरील चर्चा दिवसभर चालेल हे गृहीत धरून सदस्यांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. पण काही सदस्यांच्या निरुत्साहामुळे व निरर्थक प्रश्न उपस्थित करण्याच्या धोरणामुळे चर्चेचा एक दिवस व्यर्थ गेला.स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर अनेक सदस्यांनी ज्येष्ठ सदस्यांविषयीही नाराजी व्यक्त केली. अनेक सदस्यांनी जमेच्या बाजूवर चर्चा करण्यासाठी मुद्दे तयार केले होते, परंतु चर्चाच होवू शकली नाही. पूर्ण दिवस व्यर्थ गेल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.वास्तविक आयुक्तांनी त्यांचे मुद्दे मांडले आहेत.अर्थसंकल्प सादर करताना पैसे कसे येणार याची सविस्तर माहिती दिली आहे. सदस्यांना अभ्यास करण्यासाठी १२ दिवसांची संधी दिली होती. यानंतर चर्चेच्या पहिल्याच दिवशी निरर्थक प्रश्न उपस्थित करण्यात आले.स्थायी समितीमध्ये पहिल्यांदाच अर्थसंकल्पावर एवढी निरर्थक चर्चा झाल्याचे मत काही नगरसेवकांनी व्यक्त केले. काही सदस्यांनी याविषयी सांगितले की, प्रशासनाने त्यांचे आकडे दिले आहेत. तेच आकडे पुन्हा वदवून घेण्यात काहीही अर्थ नाही. जमा व खर्चाच्या मुद्यावर सविस्तर तपशीलवार चर्चा व्हावी व सर्वांना चर्चा करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.७ मार्चला सभा : अर्थसंकल्पावर ५ ते ७ मार्चपर्यंत तीन दिवस विशेष सभेचे आयोजन केले होते. यामधील पहिला दिवस व्यर्थ गेला असून ६ तारखेला सभा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ७ मार्चला सभा होणार असून एक दिवसात जमा व खर्चावर चर्चा होणार की चर्चेचे दिवस वाढविले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अर्थसंकल्पावरील चर्चेचा पहिला दिवस व्यर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 7:07 AM