पहिल्या डिजिटल न्यायालयाची सुरूवात बेलापूरातून; मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या हस्ते शुभारंभ
By सूर्यकांत वाघमारे | Published: April 7, 2023 04:57 PM2023-04-07T16:57:14+5:302023-04-07T16:57:38+5:30
पहिल्या डिजिटल न्यायालयाची सुरूवात बेलापूरातून करण्यात आली आहे.
नवी मुंबई: बेलापूर न्यायालयात दिवाणी (वरिष्ठ) व सत्र न्यायायल्याच्या कामकाजाला मंजुरी मिळाली असून शुक्रवारी त्याचा शुभारंभ करण्यात आला. या दोन्ही कोर्टाचे कामकाज पूर्णपणे डिजिटल चालणार असल्याने देशातील पहिल्या डिजिटल न्यायालयाचा मान बेलापूर न्यायालयाला मिळाल्याचा आनंद मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी व्यक्त केला. याप्रसंगी न्यायमूर्ती गौरी गोडसे, जिल्हा न्यायाधीश अभय मंत्री यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबईकरांना सत्र न्यायालयीन खटल्यानिमित्ताने व ५ लाखावरील दाव्यांसाठी ठाणे न्यायालयात पायपीट करावी लागत होती. त्यामुळे बेलापूर न्यायालयात देखील सत्र न्यायालयाचे व दिवाणी (कनिष्ठ) न्यायालयाच्या कामकाजाला देखील अनुमती मिळावी यासाठी कोर्ट बार असोसिएशनकडून सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्याला अनुमती मिळाल्याने यापुढे बेलापूर न्यायालयात सत्र न्यायालय व कनिष्ठ दिवाणी न्यायालय देखील चालणार आहे. त्याचा शुभारंभ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या हस्ते न्यायमूर्ती गौरी गोडसे, जिल्हा न्यायाधीश अभय मंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी न्यायमूर्ती पटेल यांनी न्यालयालयातील दोन ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना उदघाटनाचा सन्मान दिला.
उदघाटन प्रसंगी पटेल यांनी सदर न्यायालयात डिजिटल कामकाज चालणार असल्याने हे न्यायालय राज्यातील व देशातील पहिले डिजिटल न्यायालय ठरणार असल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच बेलापूरमध्ये सत्र न्यायालय देखील सुरु करावे यासाठी झटणाऱ्या प्रत्येकाच्या प्रयत्न व जिद्दीचे कौतुक केले. कार्यक्रमप्रसंगी न्यायालयाच्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा सदस्य गजानन चव्हाण, जिल्हा सत्र न्यायाधीश अभय मंत्री, जिल्हा अतिरिक्त न्यायालय न्यायाधीश पराग सहाणे, दिवाणी न्यायालय (वरिष्ठ) न्यायाधीश सूर्यकांत इंदुलकर, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कोर्ट बार असोसिएशन अध्यक्ष सुनील मोकल, संदीप रामकर, अक्षय काशीद आदी उपस्थित होते.