एनएमएमटीच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:27 PM2019-08-19T23:27:44+5:302019-08-19T23:27:59+5:30
महानगरांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक बसेसचा जास्तीत जास्त वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास केंद्र शासनाकडून ३० इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार आहेत. यामधील पहिली बस उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाली असून पुढील एक महिन्यात या बसेस प्रत्यक्ष रोडवर धावणार आहेत.
महानगरांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक बसेसचा जास्तीत जास्त वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेलाही शासनाच्या योजनेमधून ३० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी ४० टक्के शासनाचा व ६० टक्के महापालिकेचा निधी वापरण्यात येणार आहे. एनएमएमटीच्या ताफ्यात एक बस आली आहे. उर्वरित बसेसही १५ दिवसामध्ये उपलब्ध होणार आहेत. आरटीओ पासिंग केल्यानंतर त्यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात येणार आहे.
इलेक्ट्रिक बसेसमुळे इंधनाचा वापर कमी होणार आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासही मदत होणार आहे. बसेसच्या चार्जिंगसाठी तुर्भे डेपोमध्ये सुविधा उपलब्ध केली आहे. यानंतर वाशी, कोपरखैरणे, ऐरोली व सीबीडी डेपोतही चार्जिंगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
केंद्र शासनाच्या योजनेमधून ३० इलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. पंधरा दिवसात सर्व बसेस उपलब्ध होतील. यानंतर आरटीओ पासिंग करून घेतल्यानंतर प्रत्यक्ष बसेस सुरू केल्या जाणार आहेत.
- शिरीष आरदवाड,
परिवहन व्यवस्थापक, एनएमएमटी