पहिली महासभा नाट्यगृहात

By admin | Published: June 11, 2017 03:12 AM2017-06-11T03:12:18+5:302017-06-11T03:12:18+5:30

पनवेल शहर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष महापालिकेच्या पहिल्या महासभेकडे लागले आहे. पनवेल महापालिकेच्या नव्या इमारतीचे

In the first General Assembly theater | पहिली महासभा नाट्यगृहात

पहिली महासभा नाट्यगृहात

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

पनवेल : पनवेल शहर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष महापालिकेच्या पहिल्या महासभेकडे लागले आहे. पनवेल महापालिकेच्या नव्या इमारतीचे काम सुरू असल्याने पहिली-वहिली महासभा आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडणार आहे. महापौर, उपमहापौरांच्या निवडीनंतरच महासभेची तयारी पार पडणार आहे.
महापालिकेच्या २० प्रभागांतून एकूण ७८ नगरसेवक पनवेल महानगरपालिकेवर निवडून आले आहेत. भाजपाने पालिकेवर एकहाती सत्ता मिळवली असून, शेकापला विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. रायगड जिल्ह्यातील पहिल्या पनवेल महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. पनवेल नगरपरिषदेमार्फत निवडून आलेल्या अनेक अनुभवी नगरसेवकांचे पराभव झाल्याने स्वीकृत नगरसेवकपदाच्या माध्यमातून सभागृहात वाइल्ड कार्ड इंट्री घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. साधारणत: १५ तारखेनंतर पालिकेची महासभा पार पडेल. १५ तारखेपर्यंत रायगड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महापौर, उपमहापौर आदींच्या निवडणुका पार पडतील. पनवेल महापालिकेच्या पहिल्या महासभेत नव्याने नियुक्त झालेल्या नगरसेवकांची ओळख परेड, त्यांनतर विकासाचे मुद्दे, ध्येय धोरण, महापालिका मुख्यालय, नगरसेवकांच्या प्रभागात पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत अथवा सिडकोमार्फत रखडलेली कामे आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
महापौर, उपमहापौर, सभापती आदींना बसण्यासाठी सभागृह, कॅबिन यासंदर्भात पालिकेच्या वतीने निविदा काढण्यात आली असल्याची माहिती आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली. लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.

प्रश्न सोडविण्यासाठी मिनी महानगर
चार प्रभाग समितीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात प्रभाग कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. ही कार्यालये मिनी महानगरपालिका म्हणून कार्यरत असतील.
प्रभागांतील नागरिकांना प्रत्येक वेळी महानगरपालिकेत खेटे मारावे लागू नये, म्हणून आपल्या प्रभागातील समस्या नळजोडणीपासून ते ड्रेनेज समस्या, टॅक्स, पाण्याची समस्या आदींसह रहिवाशांच्या निगडित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक या मिनी महानगरपालिका कार्यालयातून होणार आहे.

Web Title: In the first General Assembly theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.