मेट्रोचा पहिला टप्पा निर्धारित वेळेतच

By admin | Published: June 20, 2017 06:06 AM2017-06-20T06:06:28+5:302017-06-20T06:06:28+5:30

विविध तांत्रिक अडथळ्यांमुळे रखडलेल्या सिडकोच्या ‘मेट्रो’ प्रकल्पाने आता गती घेतली आहे. तळोजा पाचनंद येथे रेल्वे मार्गावर उड्डाणपूल बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

The first phase of the Metro is scheduled in the scheduled time | मेट्रोचा पहिला टप्पा निर्धारित वेळेतच

मेट्रोचा पहिला टप्पा निर्धारित वेळेतच

Next

कमलाकर कांबळे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : विविध तांत्रिक अडथळ्यांमुळे रखडलेल्या सिडकोच्या ‘मेट्रो’ प्रकल्पाने आता गती घेतली आहे. तळोजा पाचनंद येथे रेल्वे मार्गावर उड्डाणपूल बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच कंत्राटदारांच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे रखडलेली स्थानके उभारण्याच्या कामांचा तिढा सुटला आहे. त्यामुळे उर्वरित कामांना गती देण्यात आली आहे. एकूणच निर्धारित वेळेतच म्हणजे सप्टेंबर २0१८ मध्येच मेट्रोचा पहिला टप्पा प्रवाशांना खुला केला जाईल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.
सिडकोने २0११ मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तीन टप्प्यांत हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यासाठी चार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. कंत्राटदारांच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे ही कामे काही प्रमाणात रखडली आहेत. त्याचा फटका सिग्नल, टेलिकम्युनिकेशन, रोलिंग आणि आॅटो फेअर या कामांना बसला आहे. व्हायडक्टचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तळोजा पाचनंद येथे दिवा-पनवेल रेल्वेमार्गावर मेट्रोसाठी पूल बांधण्याच्या कामानेसुद्धा वेग घेतला आहे. एकूणच सप्टेंबर २0१८मध्ये ११ कि.मी. लांबीचा मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यादृष्टीने कामाला गती देण्यात आली आहे. विशेषत: सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी आग्रही आहे. तशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला डिसेंबर २0१४पर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु विविध कारणांमुळे कामाचा वेग मंदावल्याने ही मुदत २0१५व नंतर जानेवारी २0१७पर्यंत वाढविण्यात आली; परंतु मेट्रोबरोबरच सिडकोच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैनाचा विकास आणि स्मार्ट सिटी हे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. डिसेंबर २0१९ला आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाचे टेकआॅफ होईल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. त्यानुसार विमानतळपूर्व कामांना गती देण्यात आली आहे. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले विमानतळ व मेट्रो हे दोन्ही प्रकल्प वर्षभराच्या अंतराने लागोपाठ पूर्ण करण्याची सिडकोची योजना आहे.

चिनी बनावटीच्या आठ गाड्या धावणार
नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. ११ कि.मी. लांबीच्या या मार्गावरून प्रत्येक तीन डब्यांच्या एकूण ८ मेट्रो धावणार आहेत. या मेट्रो चीन येथून आयात केल्या जाणार आहेत. त्यापैकी दोन मेट्रो चाचणीसाठी आॅगस्टमध्ये सिडकोच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

प्रकल्प खर्चात वाढ
मेट्रोचा पहिला टप्पा सप्टेंबर २0१८पर्यंत पूर्ण करण्याचा सिडकोचा निर्धार आहे. ११ कि.मी. लांबीच्या या मार्गासाठी सुरुवातीच्या काळात दोन हजार कोटी रुपये खर्च अंदाजित करण्यात आला होता. दुसरा टप्पा ८.३५ कि.मी. लांबीचा आहे. तळोजा एमआयडीसी-कळंबोली-खांदेश्वर मार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. पहिल्या दोन टप्प्यांना जोडण्यासाठी तिसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. हा टप्पा केवळ २ कि.मी. लांबीचा असून, त्यासाठी ५७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे; परंतु पहिलाच टप्पा चार वर्षे रखडल्याने उर्वरित तीन टप्प्यांचे कामही लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या एकूण खर्चात वाढ होणार आहे.

Web Title: The first phase of the Metro is scheduled in the scheduled time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.