नारायण जाधव
नवी मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा २१,२०० कोटी रुपये खर्चाचा शिवडी ते न्हावा-शेवा अर्थात अटल सागरी सेतूवर कारसाठी २५० रुपये टाेल आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आपल्या बुधवारच्या बैठकीत घेतला तर सागरी सेतूवर जे टोलनाके आहेत, तिथे ऑटोमॅटिक पद्धतीने टोल वसूल केला असणार असून, बूम बॅरिअर नसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशा प्रकारे टोल वसुलीसाठी बूम बॅरिअर नसलेला अटल सेतू देशातील पहिला रस्ता राहणार आहे. ऑस्ट्रेलियन कंपनीस हा टोलनाका उभारण्याचे काम दिले असल्याचेही सूत्रे म्हणाली.
प्रकल्पावर झालेला खर्च वसूल करण्यासाठी सुमारे ३० वर्षांसाठी पथकर आकारण्याचा निर्णय मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने घेतला असून, त्यासाठी नवी मुंबईतील उलवेजवळ शिवाजीनगर आणि चिर्ले (गव्हाण) या दोन ठिकाणी पथकर नाके उभारण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर या मार्गावरील पथकराचा दर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील पथकरांपेक्षा कमी असल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे.
अत्याधुनिक टोलनाक्यावर ४२७ कोटींचा खर्च
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने ऑस्ट्रेलियन कंपनीस ४२७ कोटी रुपये खर्चून इंटेलेंजेस ट्रान्सपोर्टेशन सिस्टिमची अंमलबजावणी करण्याचे काम दिले आहे. ज्यात प्रशासकीय इमारत, कमांड कंट्रोल सेंटर, रोड लाइट्स, इलेक्ट्रिकल आणि युटिलिटी वर्कमधील १३३ कॅमेरे असलेल्या ओपन रोड टोलिंग सिस्टमचा समावेश आहे. टोलनाक्यावर बूम नसल्याने शिवडी आणि नवी मुंबई विमानतळदरम्यानच्या प्रवासाची वेळ २० मिनिटांपेक्षा कमी असणार आहे. पॅकेज ४ अंतर्गत संपूर्ण पुलासाठी JICA च्या देखरेखीखाली ऑस्ट्रेलियन कंपनी Kaspch ला हे काम देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.पंतप्रधानाच्या कार्यक्रमासाठी सिडको करणार पावणेआठ कोटींचा खर्च
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच या सागरी सेतूचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासाठी नवी मुंबई विमानतळानजीकच्या जागेत पंतप्रधानांची सभा होणार आहे. त्यासाठी विमानतळ प्रकल्पातील नियोजित जागेवर प्रवेशद्वार आणि बाहेर जाण्याचा मार्ग तसेच अंतर्गत रस्ते बनविण्यासाठी २ कोटी ६५ लाख रुपये आणि मैदान तयार करणे, मंडप बांधणे, वाहनतळाची सोय करण्यासाठी ५ कोटी २३ लाख अशी ७ कोटी ८८ लाख रुपयांची कामे सिडको करणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.