‘नैना’चा पहिला टप्पा अतिक्रमणांच्या फेऱ्यात

By admin | Published: February 12, 2017 03:26 AM2017-02-12T03:26:24+5:302017-02-12T03:26:24+5:30

नैना क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा धडाका सुरू आहे. या अतिक्रमणांना वेळीच आळा घातला गेला नाही, तर नैनाच्या विकासाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता

First round of 'Naina' encroachment rounds | ‘नैना’चा पहिला टप्पा अतिक्रमणांच्या फेऱ्यात

‘नैना’चा पहिला टप्पा अतिक्रमणांच्या फेऱ्यात

Next

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबई

नैना क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा धडाका सुरू आहे. या अतिक्रमणांना वेळीच आळा घातला गेला नाही, तर नैनाच्या विकासाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या क्षेत्रातील बेकायदा बांधकामांना प्रतिबंध घालण्यात सिडकोच्या संबंधित यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरल्या आहेत. ही बाब भविष्यकालीन नियोजनाला मारक ठरण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र अर्थात नैना क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने सिडकोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार या क्षेत्रातील २२४ गावांंतील ४७४ चौरस किलोमीटर परिसरात पायाभूत सुविधांचे नियोजन करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. यातील २३ गावांचा समावेश असलेल्या ३७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या प्रारूप विकास आराखड्याला राज्य सरकारने अलीकडेच मंजुरी दिली आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित २0१ गावांच्या विकास आराखड्यावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे; परंतु या क्षेत्रात सुरू असलेल्या विनापरवाना बांधकामांना प्रतिबंध घालण्यात सिडकोच्या संबंधित विभागाला अपयश आले आहे. याचा परिणाम म्हणून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांना वेळीच आवर घातला नाही, तर नैनाच्या विकासाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नैनाचे क्षेत्र विस्तीर्ण असल्याने या परिसरातील बेकायदा बांधकामांवर लक्ष ठेवणे सिडकोच्या दृष्टीने जिकरीचे होऊन बसले आहे. यातच अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, आवश्यक साधनसामग्रीचा अभाव, तसेच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बांधकामधारकांशी प्रस्थापित झालेले अर्थपूर्ण संबंध आदी बाबी भूमाफियांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून, या क्षेत्रात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत. ही बाब नैनाच्या विकासाला मोठा अडथळा ठरणार आहे.
विमानतळ प्रभावित क्षेत्रात मोठमोठ्या गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे या परिसरातील जमिनीच्या किमतीसुद्धा वाढू लागल्या आहेत. नेमका याचा फायदा घेत भूमाफियांनी आता नैना क्षेत्रातील मोकळ्या भूखंडांवर डोळा ठेवला आहे. मोकळ्या जागा बळकावून त्यावर मोठमोठे गृहप्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. अनेकांनी मोकळ्या भूखंडांना कुंपण घालून गृहप्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्याचे जोरदार बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. विशेषत: नैना क्षेत्रांतर्गत मोडणाऱ्या सुकापूर, नेरे, उम्रोली, विचुंबे, तळोजा आदी परिसरांत हा प्रकार सुरू आहे. या विभागात सध्या शेकडो नवीन गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. तर अनेक प्रकल्प प्रस्तावित करून घरांची बुकिंग सुरू करण्यात आली आहे. या परिसरात सध्या तीन ते चार हजार रुपयांनी घरांची बुकिंग घेतली जात आहे. शेजारच्या विकसित क्षेत्राच्या तुलनेत हे दर कमी असल्याने सर्वसामान्य ग्राहक त्यात सहजरीत्या फसताना दिसत आहेत.

अतिक्रमण विभागाचा अर्थपूर्ण कारभार
सिडकोच्या अतिक्रमण विभागामार्फत नैना क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाते. या विभागाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत या क्षेत्रात सुरू असलेल्या शेकडो बांधकामांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. यापैकी हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच बांधकामांवर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित बांधकामांना संबंधित विभागाकडून अर्थपूर्ण पाठबळ मिळत असल्याचे एकूण चित्र आहे.

२० वर्षांचे गणित कोलमडणार
नैना क्षेत्राचा पहिल्या टप्पा पुढील सात वर्षांत पूर्ण केला जाणार आहे. त्यासाठी तब्बल सात हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तर पुढील टप्प्यातील पायभूत सुविधांवर सिडको तब्बल १२,६00 कोटी रुपये खर्च करणार आहे. ही रक्कम नैना योजनेंतर्गत सिडकोला प्राप्त होणाऱ्या ४0 टक्के भूखंडांपैकी १५ टक्के भूखंडांच्या विक्रीतून उभारली जाणार आहे. दोन्ही टप्पे पुढील २० वर्षांत पूर्ण करण्याची सिडकोची योजना आहे; परंतु अनधिकृत बांधकामांना वेळीच आवर घातला गेला नाही, तर हे गणित कोलमडण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.

सिडकोच्या आवाहनाला केराची टोपली
स्वस्त व बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून ओळख निर्माण झालेल्या सिडकोच्या नैना क्षेत्रात बोगस गृहप्रकल्पांचा सुळसुळाट झाला आहे. फसवणुकीच्या विविध प्रकरणांत गुन्हे दाखल झालेले काही विकासक पुन्हा या क्षेत्रात सक्रिय झाले आहेत. बोगस गृहप्रकल्पांच्या नावाने ग्राहकांना लुटण्याचे सत्र सुरूच असल्याने ग्राहकांनी नैना क्षेत्रात घरे घेताना सावधानता बाळगण्याचे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, स्वस्त घरांच्या शोधात असलेल्या गरजू ग्राहकांनी या आवाहनाला केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले आहे.

Web Title: First round of 'Naina' encroachment rounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.