पहिलीच्या विद्यार्थ्याला पँट काढण्याची शिक्षा, सेंट जोसेफमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 04:58 AM2018-07-19T04:58:20+5:302018-07-19T04:58:31+5:30
सेंट जोसेफ शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने वर्गात मस्ती केली म्हणून शिक्षिकेने पँट काढण्याची शिक्षा केली.
कळंबोली : सेंट जोसेफ शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने वर्गात मस्ती केली म्हणून शिक्षिकेने पँट काढण्याची शिक्षा केली. या प्रकरणी शिक्षिकेवर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
सेंट जोसेफ हायस्कूल व्यवस्थापनाच्या मनमानीविरोधात पालकांनी अनेक वेळा आंदोलन केले आहे. कळंबोलीतील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये पहिलीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याने मस्ती केली म्हणून १४ जुलै रोजी पूजा पवार या शिक्षिकेने त्यांची पँट काढली आणि त्याला वर्गात उभे केले. इतर मुलांनी चिडविल्याने शिक्षा झालेल्या विद्यार्थ्याला ही बाब लज्जास्पद वाटली. हा प्रकार समजल्यानंतर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या पालकाने याबाबत सुरुवातीला शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली. मात्र, संबंधित शिक्षिकेवर व्यवस्थापनाने काहीही कारवाई केली नाही.
पालकांनी याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पालकांच्या तक्रारीवरून कळंबोली पोलिसांनी शिक्षिका पूजा पवारविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणी प्रतिक्रिया घेण्यासाठी मुख्याध्यापिका रंजना चाफले यांच्याशी संपर्क साधला, परंतु व्यवस्थापनाच्या वतीने कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
शिवसेना आक्र मक
सेंट जोसेफ शाळेत घडलेला प्रकार चुकीचा आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षिकेवर कारवाई करावी व मुख्याध्यापकांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी दीपक निकम यांनी
केली आहे.