नवी मुंबईतून पुढच्या वर्षी पहिले टेकऑफ, सिडकोचा दावा, विमानतळाचे ६३ टक्के काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 06:42 AM2024-03-26T06:42:25+5:302024-03-26T06:43:02+5:30
यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत विमानांच्या उड्डाणाची चाचणी घेणे अपेक्षित असल्याचेही स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई : देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. ३१ मार्च २०२५ मध्ये या विमानतळावरून विमानाचे पहिले टेकऑफ होईल, असा दावा करण्यात येत आहे. सध्या येथील कामाने वेग घेतला असून, आतापर्यंत ६३ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा सिडकोने केला आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत विमानांच्या उड्डाणाची चाचणी घेणे अपेक्षित असल्याचेही स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयएपीए) अदानी समूहाद्वारे रायगड जिल्ह्यातील पनवेलनजीकच्या १६०० हेक्टर जागेवर हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे. यात सिडको ही नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे. या प्रकल्पासाठी १९ हजार ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे.
दरम्यान, सध्या पहिल्या दोन टप्प्याच्या कामावर भर दिला जात आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे यासाठी आग्रही आहेत. त्यामुळेच व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारताच सर्वप्रथम त्यांनी विमानतळ प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली.
पाच टप्प्यात प्रकल्प पूर्ण
हा ग्रीनफिल्ड प्रकल्प ५ टप्प्यात पूर्ण हाेणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात वर्षाला दोन कोटी प्रवासी क्षमता असणार आहे. पहिल्या टप्प्याचे ६३ टक्के काम पूर्ण झाल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. प्रकल्पाचे पाच टप्पे पूर्ण झाल्यावर विमानतळाला चार टर्मिनल आणि दोन धावपट्टी असतील. तसेच विमानतळावर उत्तम दर्जाची रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जल कनेक्टिव्हिटीचे नियोजन केले आहे.
निर्धारित कालावधीत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार एक धापवट्टी आणि टर्मिनल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
एकूणच प्रकल्पाच्या कामाची गती पाहता, यावेळी तरी विमानतळाची डेडलाइन हुकणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.