आधी श्रीगणेशाला निरोप, मग ईदचा जुलूस; नवी मुंबईच्या बैठकीत निर्णय

By सूर्यकांत वाघमारे | Published: September 14, 2023 05:06 PM2023-09-14T17:06:39+5:302023-09-14T17:06:49+5:30

नवी मुंबईत हिंदू मुस्लिम एकतेची हाक 

First the farewell to Shri Ganesha, then the Eid procession; Decision in the meeting, call for Hindu Muslim unity in Navi Mumbai | आधी श्रीगणेशाला निरोप, मग ईदचा जुलूस; नवी मुंबईच्या बैठकीत निर्णय

आधी श्रीगणेशाला निरोप, मग ईदचा जुलूस; नवी मुंबईच्या बैठकीत निर्णय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अनंत चतुर्थी व ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्याने निर्माण झालेला पेच प्रसंग मुस्लिम समाजाने एकमताने सोडवला आहे. अनंत चतुर्थीला ईद साजरी कर करता दुसऱ्या दिवशी जुलूस काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. त्यामुळे दोन्ही धर्माच्या मिरवणुका एकमेकांसमोर येण्याचे टळून समाजकंटकांकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.

मागील काही वर्षात देशात हिंदू मुस्लिम समाजात एकमेकांबद्दल तेढ निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे शहरांची शांतता देखील भंग होत असल्याने दोन्ही धर्माच्या सण उत्सवावर देखील मर्यादा येत आहेत. त्यातच २८ सप्टेंबरला अनंत चतुर्थी व ईद ए मिलाद एकाच दिवशी आले आहेत. दोन्ही समाजाकडून मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे विसर्जन मिरवणूक व जुलूस एकमेकांसमोर आल्यास समाजकंटकांकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. हे टाळण्यासाठी मुस्लिम समाजाने श्रीगणेशाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी वाट मोकळी करून देत दुसऱ्या दिवशी ईद ए मिलाद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम एकता फाउंडेशनचे मौलाना आलम बाबा व गरीब नवाज कमिटीचे मौलाना सुभानी यांनी त्याची घोषणा गुरुवारी वाशी येथे पोलिसांच्या वतीने आयोजित बैठकीत करण्यात आली. तसेच ईद साजरी करत असताना स्वच्छतेला देखील प्राधान्य देण्याचे आवाहन केले.  

दोन्ही उत्सव शांततेत पार पाडावेत यासाठी परिमंडळ उपायुक्त विवेक पानसरे यांच्या वतीने वाशीत सर्वधर्माच्या प्रमुखांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये महापालिका, अग्निशमन दल, महावितरण तसेच इतरही संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपायुक्त पानसरे यांनी दोन्ही उत्सव कशा प्रकारे शांततेत पार पाडून शहराचा नावलौकिक वाढवला जाईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच गणेशोत्सव मंडळांना देखील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सूचना केल्या. महापालिका उपायुक्त श्रीराम पवार यांनीही मंडळांना पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती वापराव्यात असे आव्हान केले. तसेच विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करून नैसर्गिक तलावांचे प्रदूषण टाळून प्लास्टिक मुक्त उत्सव साजरा करण्याचेही आवाहन केले. या बैठकीस परिमंडळ एक मधील दहा पोलिसठाण्याच्या हद्दीतले गणेशोत्सव मंडळांचे प्रमुख व मुस्लिम समाजाच्या प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या.

Web Title: First the farewell to Shri Ganesha, then the Eid procession; Decision in the meeting, call for Hindu Muslim unity in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.