लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : दिवाळे गावातील जुन्या मासळी मार्केटच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्केटच्या उभारणीसाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून १ कोटी २५ लाख रुपये कोटींची तरतूद केली आहे, तर महापालिकेने ४० लाख रुपये खर्चाची तरतूद केली आहे. १ कोटी ६५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा मासळी मार्केटच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. फगवाले मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक अनंता बोस यांच्या हस्ते रविवारी मार्केटचे भूमिपूजन झाले.
दिवाळी गावातील मासळी मार्केटच्या उभारणीचा प्रश्न मागील अनेक वर्षे रखडला होता. त्यासाठी राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडे सलग दोन वर्षे पाठपुरावा करावा लागला. संबंधित विभागाच्या परवानग्या मिळविताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. अखेर हे सर्व अडथळे दूर झाले असून, लवकरच दिवाळे मासळी मार्केटची सुसज्ज अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी वास्तू तयार होईल, असा विश्वास आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. गेली अनेक वर्षे मासळी विक्री करताना समस्यांना सामोरे जावे लागत होते. याबाबत आम्ही आमदार मंदा म्हात्रे यांना साकडे घालत सर्व सुविधांयुक्त मार्केट उभारण्याची मागणी केली होती, परंतु सदर मार्केटच्या जागेचा प्रश्न कायद्याच्या कचाटीत अडकल्यामुळे थोडी दिरंगाई झाली, परंतु आता सर्व काही सुरळीत झाल्याने मासळी विक्रेत्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे एकवीरा मच्छी विक्रेता संघाच्या अध्यक्षा सुरेखा कोळी यांनी यावेळी स्पष्ट केले. स्थानिक नगरसेविका भारती कोळी यांचेही भाषण झाले.
यावेळी माजी सभापती संपत शेवाळे, डॉ.जयाजी नाथ, स्थानिक नगरसेविका भारती कोळी, नगरसेवक अशोक गुरखे, दीपक पवार, परिवहन सदस्य काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक दि.ना.पाटील, विकास सोरटे, बाळकृष्ण बंदरे, दर्शन भारद्वाज, दीप्ती कोळी, प्रियांका म्हात्रे, सुभाष गायकवाड, तसेच असंख्य मासळी विक्रेत्या महिला उपस्थित होत्या.
खरेदीसाठी नागरिकांची होतेय गर्दीnदिवाळे मासळी मार्केट हे शहरातील प्रसिद्ध मार्केट आहे. या मार्केटमध्ये मासळी खरेदीसाठी शहराच्या कानाकोपऱ्यांतून लोक येतात; परंतु मागील काही वर्षांत या मार्केटची दुरावस्था झाली आहे. वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. nया पार्श्वभूमीवर मार्केटची पुनर्बांधणी करण्याची मागणी गावातील पारंपरिक मासळी विक्रेत्यांकडून केली जात होती. त्यानुसार आमदार मंदा म्हात्रे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला आहे. nसर्व सुविधांनीयुक्त नवीन मार्केट होणार असल्याने मासळी विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.