मीरारोड - प्रवासात ओळख झालेल्या एका वृध्देने मोदी सरकारच्या योजनेतुन पैसे मिळवुन देण्याचे आमिष दाखवत एका मासळी विक्रेत्या महिलेस चहा मधुन गुंगीचे औषध देऊन दागीने चोरुन पळ काढला. या प्रकरणी मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.भारती पार्क समोरील मातोश्री नगर मध्ये सुनिता संतोष गुजर (३९)ह्या पती व दोन मुलींसह राहतात. त्या मासळी विक्रीचा व्यवसाय करतात. मालाड येथील मैत्रीणी कडुन मीरारोड येथे खाजगी वाहनाने परत येत असताना वाहनात सुमारे ६५ ते ७० वयोगटातील वृध्द महिलेशी त्यांची ओळख झाली. मोदी सरकार ३५ वर्ष वया वरील महिलांना दर महा ४३०० रुपये देत आहे. त्याचा अर्ज भार्इंदर पालिकेच्या टेंबा (जोशी ) रुग्णालय येथे मिळत असुन तो भरुन दिल्यास तुला पैसे मिळतील असे वृध्देने सांगीतले.काही दिवसांनी २५ जुन रोजी त्या एसके स्टोन येथे मासळी आणण्यासाठी गेल्या असता तेथे ती वृध्द महिला पुन्हा भेटली व अर्ज भरण्यास सांगीतले. वृध्देने लघुशंकेला जायचे म्हणुन सांगत सुनितांचे घर गाठले. सुनिता यांनी देखील वृध्द महिला आहे म्हणुन आपुलकीने जेवण दिले. जेवण करुन ती वृध्दा निघुन गेली. दुसराया दिवशी सकाळी ती महिला परत सुनिताच्या घरी आली. टेंबा रुग्णालयातले काम झाले आहे सांगुन फोटो आणि काही कागदपत्रे तीने मागीतले. सुनिताने मुलीला विचारुन फोटो, कागदपत्रं देते असे सांगीतले.दुपार झाल्याने त्या दिवशी देखील सुनिताने तीला जेवण दिले व स्वत: साठी गॅसवर चहा ठेवला आणि बाथरुमला गेल्या. बाहेर आल्यावर गॅस जवळील दुधाचा रंग सुनिता यांना बदललेला दिसला. पण चहा मात्र झाकलेला असल्याने दूध टाकुन देत त्या चहा प्यायल्या. चहा पिताच काही वेळाने चक्कर येऊन अशक्तपणा जाणवला. गुंगी येताच त्या वृध्देने सुनितांच्या गळ्यातील मंगळसुत्र व कानातले दोन झुमके असे ३५ हजारांचे सोन्याचे दागीने काढून पोबारा केला.
सरकारी योजनेतुन पैसे मिळवुन देण्याच्या आमिषाने मासळी विक्रेतीस लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 7:55 PM