हत्येप्रकरणी पाच जणांना अटक, खारघरमधील लॉण्ड्री व्यावसायिक हत्या प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 03:13 AM2018-02-10T03:13:50+5:302018-02-10T03:14:05+5:30
खारघर सेक्टर १२मध्ये मनोज कनोजिया या लॉण्ड्री व्यावसायिकाची मंगळवारी सायंकाळी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण खारघर परिसरात खळबळ उडाली होती. खारघर पोलिसांनी या घटनेचा छडा लावत सर्व आरोपींना दोन दिवसांत अटक केली आहे.
पनवेल : खारघर सेक्टर १२मध्ये मनोज कनोजिया या लॉण्ड्री व्यावसायिकाची मंगळवारी सायंकाळी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण खारघर परिसरात खळबळ उडाली होती. खारघर पोलिसांनी या घटनेचा छडा लावत सर्व आरोपींना दोन दिवसांत अटक केली आहे.
मनोज कनोजिया याचे मुख्य आरोपी लालजी प्यारेलाल रामप्रसाद (४१) याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हत्या करण्यापूर्वी लालजी रामप्रसाद याने कनोजियाच्या डोळ्यात आणि तोंडात अॅसिड टाकले. त्यानंतर लोखंडी सळईने डोक्यावर वार केले. हत्येत लालजी प्यारेलालसोबत गोलुकुमार महेंद्र मंडल (१८), राजीव जयप्रसाद शर्मा (२१), अखलाकुल मोतींन अन्सारी (१८), सोमनाथ प्रेमचंद पाण्डेय (२३), सुनील रामप्रसाद भारती (२४) या आरोपींचाही समावेश होता. सर्व आरोपींना खारघर पोलिसांनी दोन दिवसांत अटक केली आहे. यापैकी मुख्य आरोपीला तळोजा येथून अटक करण्यात आली तर अन्य पाच आरोपींना कळंबोलीतून पकडण्यात आले. शुक्रवारी त्यांना पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले. खारघर पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देवीदास सोनावणे यांच्यासह आरोपींना शोधण्यासाठी नेमलेल्या पथकाने दोन दिवसांत आरोपींचा छडा लावून त्यांना जेरबंद केले.