नवी मुंबई : उलवे येथे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आणि पुन:स्थापनेसाठी आरक्षित असलेल्या पाच एकर जागेवरील अतिक्रमण सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक पथकाने काढून टाकले. या कारवाईअंतर्गत भूखंडावर उभारण्यात आलेले बेकायदा कंटेनर तळ उद्ध्वस्त करीत गोदामे व उपाहारगृहावर बुलडोझर फिरविण्यात आला. तसेच सुमारे पन्नास कंटेनर जप्त करण्यात आले.उलवे क्षेत्रात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत. सिडकोच्या मोकळ्या जागा बळकावून त्यावर बेकायदेशीर शेड्स, कंटेनर यार्ड तसेच गोदामे उभारली जात आहेत. सेक्टर २५ए येथील आर अॅण्ड आर अर्थात पुनर्वसन आणि पुन:स्थापनेसाठी आरक्षित असलेल्या पाच एकर जागेवर मेसर्स जे.कुमार या कंपनीने मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम केले होते.या ठिकाणी कंटेनरसाठी वाहनतळ, कर्मचाºयांना राहण्यासाठी तात्पुरते निवास, उपाहारगृह तसेच भूखंडाभोवती पत्र्याचे कुंपण उभारण्यात आले होते.याबाबत सिडकोच्या वतीने संबंधित कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती. परंतु त्यास कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे प्रमुख शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
उलवे येथील पाच एकर भूखंड अतिक्रमणमुक्त, सिडकोची धडक कारवाई, बेकायदा गोदामे व उपाहारगृह तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 4:56 AM