पनवेलमध्ये पाच उमेदवार अशिक्षित
By Admin | Published: February 16, 2017 02:11 AM2017-02-16T02:11:29+5:302017-02-16T02:11:29+5:30
रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीसाठी २१ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांपैकी
मयूर तांबडे / पनवेल
रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीसाठी २१ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांपैकी पाच उमेदवार अशिक्षित आहेत, तर सात पदवीधर उमेदवार असून एक पीएचडीधारक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. काही गणांमध्ये राजकीय पक्षांना उमेदवारच मिळत नसल्याने अशिक्षितांना उमेदवारी दिली असल्याचे बोलले जात आहे.
आठ जागांसाठी शेकापने जिल्हा परिषदेसाठी आठ, भाजपा सहा, काँग्रेस ०, शिवसेना पाच, बसपा एक, भारिप एक, अपक्ष दोन असे २३ उमेदवार आहेत. तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी शेकाप १२, भाजपा १४, काँग्रेस चार, शिवसेना सात, अपक्ष दोन असे ३९ उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपा, शेकाप, काँग्रेस, शिवसेनेचा एकही पदवीधर उमेदवार उभा केलेला नाही. २३ पैकी विविध पक्षांच्या २२ उमेदवारांनी पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतले असल्याचे प्रतिज्ञापत्रासोबत लिहिले आहे. जिल्हा परिषदेचे भरत देशमुख हे उमेदवार वकील आहेत. ते गव्हाण गणातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
पं.स.साठी भाजपातर्फे पाली देवंद गणातून अमोल इंगोले, आपटा गणातून तनुजा संजय टेंबे, पळस्पे गणातून सुनील राजाराम गवंडी, वडघर गणातून रेखा म्हात्रे, नेरे गणातून राज पाटील, तर शेकापकडून आपटा गणातून नेहा महाडिक, गुळसुंदे गणातून जगदीश पवार हे उमेदवार पदवीधर आहेत. अविनाश गाताडे यांनी पीएचडी केलेली आहे. पंचायत समिती सावळे गणातून भाजपातर्फे ते निवडणूक लढवत आहेत. वडघर गटातील शिवसेनेच्या पदीबाई ठाकरे, पंचायत स्ािमतीसाठी वहाळ गणात भाजपाच्या देवकी कातकरी, काँग्रेसच्या यमुना कातकरी, शिवसेनेच्या सुरेखा वाघमारे, करंजाडे गणात शिवसेनेच्या द्रौपदी कातकरी हे पाचही उमेदवार शाळेतच गेल्या नसल्याचे प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे.