उलवेतून पाच बालकामगारांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 06:19 AM2018-12-22T06:19:00+5:302018-12-22T06:19:12+5:30
आॅपरेशन ‘मुस्कान’ अंतर्गत गुन्हे शाखा पोलिसांनी उलवे येथून पाच बालकामगारांची सुटका केली आहे. तर त्यांना नोकरीवर ठेवून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल झाले.
नवी मुंबई : आॅपरेशन ‘मुस्कान’ अंतर्गत गुन्हे शाखा पोलिसांनी उलवे येथून पाच बालकामगारांची सुटका केली आहे. तर त्यांना नोकरीवर ठेवून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल झाले.
नवी मुंबई पोलिसांकडून आॅपरेशन ‘मुस्कान’ अंतर्गत हरवलेल्या बालकांच्या शोधमोहिमेसह बालमजुरांच्या शोधासाठीही प्रयत्न होत आहेत. या दरम्यान, गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला उलवे परिसरात बालकामगार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण व कामगार आयुक्त विभागाचे दुकान निरीक्षक सुधीर देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील व्यावसायिकांची झाडाझडती घेण्यात आली, त्याकरिता सहायक निरीक्षक सुनीता भोर, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर आदींचे पथक करण्यात आले होते. त्यांच्या पाहणीमध्ये उलवे सेक्टर-५ ठिकाणी बालकामगार असल्याचे आढळून आले. सदर बालकांची सुटका करून त्यांना नोकरीवर ठेवणाºया व्यावसायिकांवर न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहीद जाहीद, भीमा नाथ, शिवरामन यादव, राजीत यादव, अनारुल बिलाल शेख अशी त्यांची नावे आहेत. टायर्स, स्नॅक सेंटर, वडापाव सेंटर, भाजीपाला विक्री केंद्र असा त्यांचा व्यवसाय असून, त्या ठिकाणी अल्पवयीन मुलांना कामगार म्हणून ठेवण्यात आले होते. त्यांच्याकडून सुटका केलेल्या पाच बालकामगारांपैकी दोघे उत्तर प्रदेशचे, एक बिहारचा, एक मध्य प्रदेशचा तर एक राजस्थानचा आहे. त्या सर्वांना बालकल्याण समितीमार्फत त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे.