नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : देखभाल-दुरुस्तीअभावी ठाणे-बेलापूर मार्गावरील बहुतेक सर्वच उड्डाणपुलांची दुरवस्था झाली आहे. यात काही पुलांच्या पृष्ठभाग अनेक ठिकाणी खडबडीत झाला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहने आदळून किंवा दुचाकी घसरण्याचे प्रकारही होत आहेत. यामुळे या मार्गावरील पाच उड्डाणपुलांची सहा कोटी ३४ लाख रुपये खर्चून दुरुस्ती करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. ही दुुरुस्ती झाल्यावर वाहने सुसाट धावण्यास मदत होऊन वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
ठाणे-बेलापूर हा शहरातील सायन-पनवेलनंतर सर्वाधिक वर्दळ असणारा मार्ग आहे. टीटीसी औद्योगिक वसाहतीत ये-जा करणारी बहुतेक वाहने याच मार्गावरून मार्गक्रमण करतात. त्यातच गेेल्या काही दिवसांपासून टीटीसी औद्योगिक पट्ट्यात आयटी कंपन्या, डाटा सेंटरची संख्या वाढली आहे. यामुळे दुचाकींसह चारचाकींची वर्दळही वाढली आहे. याशिवाय जेएनपीएतून ठाण्याकडे जाणारी कंटेनर वाहतूकही याच मार्गाने होते. यामुळे हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या मार्गावरील पाच उड्डाणपुलांच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.
असा होणार दुरुस्तीवर खर्च
तळवली उड्डाणपूल : ४,४२,६०,८२६कोपरखैरणे उड्डाणपूल : ५७,९२,९२९सविता उड्डाणपूल : ४२,१२,३०२ऐरोली उड्डाणपूल : २७,८३,३८८घणसोली उड्डाणपूल : ६३,२४,३४०ठाणे-बेलापूर रस्त्यावरील काही उड्डाणपुलांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सातत्याने लहान-मोठे अपघात होऊन वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. याबाबत नवी मुंबई वाहतूक पोलिसांनीदेखील महापालिकेस अवगत करून या पुलांची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेेने पाच उड्डाणपुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या बाबतची निविदाप्रक्रिया सुरू आहे. पाच कामांची निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र ठेकेदारास कार्यादेश दिल्यानंतर त्यांनी दोन महिन्यांत सर्व उड्डाणपुलांची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. - संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका