सूर्या नदीवर बांधणार पाच कोकण पद्धतीचे बंधारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 12:41 AM2021-02-10T00:41:10+5:302021-02-10T00:41:19+5:30
घोळ येथील बंधाऱ्याचे झाले उद्घाटन; एकूण ५० कोटींचा होणार खर्च
कासा : सूर्या नदीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे काेकण पद्धतीचे पाच बंधारे बांधले जाणार आाहेत. पालघर जिल्ह्यातील सूर्या धरण प्रकल्पांतर्गत कवडास उन्नयी बंधाऱ्याच्या अधोभागात सूर्या नदी पात्रात डहाणू तालुक्यात घोळ आंबिवली, उर्से व पालघर तालुक्यातील चिंचारे व गारगाव अशा पाच ठिकाणी हे बंधारे बांधण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ५० कोटींचा खर्च केला जाणार आहे.
घोळसाठी सहा कोटी ७५ लाख, आंबिवली सात कोटी २३ लाख, उर्से दहा कोटी ७० लाख, चिंचारे १३ कोटी ९९ लाख, गारगाव सात कोटी ३७ लाख मंजूर झाला आहे. आंबिवलीच्या बंधाऱ्याची साठवणूक क्षमता ०.५४४ द.ल.घ.मी., उर्से ०.७४८ दलघमी, गारगाव ०.६४४ दलघमी, घोळ ०.१६२ दलघमी, चिंचारे ०.१९२ दलघमी एवढी आहे. तर एकूण २.२९ दलघमी एवढी आहे. सूर्या नदीवरील घोळ येथील बंधाऱ्याचे उद्घाटन नुकतेच पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी केले. यावेळी गावित यांनी या बंधाऱ्याचा नजीकच्या गावातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार श्रीनिवास वनगा, पं.स.सदस्य अरुण कदम, कासा सरपंच रघुनाथ गायकवाड, उपसरपंच मनोज जगदेव व नागरिक उपस्थित होते.
पाण्याची पातळी वाढणार
बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी उन्हाळ्यात वाढणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच या पाण्यातून उन्हाळ्यात येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी वापर होणार असून, या भागातील पाण्याची भूजल पातळी वाढणार आहे. तसेच येथील नागरिकांना नदी पार करण्यासाठी बंधाऱ्यावर रस्ता साडेतीन ते चार मीटर ठेवला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.