पाच लाखांचे मोबाइल हस्तगत, पनवेल शहर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 01:51 AM2019-11-14T01:51:20+5:302019-11-14T01:51:24+5:30
शहर पोलिसांनी मोबाइल चोरी करणाऱ्या चार नेपाळी आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून पाच लाखांचे मोबाइल व १७ हजार ७०० रुपये जप्त करण्यात आले आहेत.
पनवेल : शहर पोलिसांनी मोबाइल चोरी करणाऱ्या चार नेपाळी आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून पाच लाखांचे मोबाइल व १७ हजार ७०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. आठवडाभरातील मोबाइलचोरांना अटक केल्याची ही दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी ११ लाखांचे मोबाइल चोरणाºया दोघांना अटक करण्यात आली होती. शहर पोलिसांच्या या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक केले जात आहे.
पनवेल शहरातील किंग्स इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे तळमजल्यावरील शटरचे लॉक तोडून चोरांनी ३ नोव्हेंबर रोजी दोन लाख २८ हजार ९०० रुपये व पाच लाख ४८ हजार ९७३ रुपयांच्या ३३ मोबाइलची चोरी केली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, पोलीस हवालदार विजय आयरे, बाबाजी थोरात, रवींद्र राऊत, पोलीस नाईक राजेश मोरे, अमरदीप वाघमारे, पोलीस शिपाई यादवराव घुले, सुनील गर्दनमारे व कर्मचाऱ्यांनी तत्काळ या गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींना अटक केली. भीम कमान बिस्टा (२५, रा. कामोठे), बिरका केरसिंग बिस्टा (३२, रा. नवीन पनवेल), चकरा उर्फ चरण बहादूर रतन शाही (२५, रा. पुणे), रमेश भवन रावल (३०, रा. कल्याण) यांना अटक करण्यात आली. यातील तीन आरोपी सोसायट्यांमध्ये वॉचमन म्हणून काम करत असून, चरण बहादूर हा हॉटेलमध्ये कुकचे काम करत आहे. आरोपींकडून चार लाख ८९ हजार ८३३ रुपयांचे वेगवेगळ्या कंपन्यांचे २९ मोबाइल व १७ हजार ७०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. घरफोडी करतानाचे हत्यार (कटावणी)देखील जप्त करण्यात आली आहे.
>पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी महत्त्वाच्या वाणिज्य व इतर आस्थापना तसेच रहिवासी सोसायट्यांनी समोरील दोन्ही बाजूस रस्ता दिसेल अशा प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत.
तसेच दुकानाच्या शटरसाठी सेंटर लॉकिंग सिस्टीम बसवून घ्यावी, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.