नवी मुंबई : शहरातून अवघ्या आठवड्याभरात पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी व एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून तीन मुली तर एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतून दोन बहिणींचे अपहरण झाले आहे. ४ ते ८ आॅक्टोबर या कालावधीत राहत्या परिसरातून त्या बेपत्ता झाल्या आहेत. शाळेला तसेच सत्संगाला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर गेल्यानंतर त्या परत आलेल्या नाहीत. एपीएमसी आवारात राहणाºया १२ व १४ वर्षे वयाच्या दोन बहिणी शाळेच्या निमित्ताने घरातून बाहेर गेल्या होत्या. मात्र त्यांच्या वडिलांची व शाळेतील शिक्षकांची भेट झाली असता, त्या शाळेत आलेल्या नसल्याचे समजले. दरम्यान, एक दिवस अगोदरच एका मुलीच्या दप्तरामध्ये आयफोन सापडला होता. याबाबत घरच्यांनी चौकशी केली असता, त्यांनी योग्य उत्तर दिले नव्हते. यामुळे वडिलांंनी दप्तर पुन्हा एकदा तपासले असता, एका कागदावर मोबाइल नंबर आढळला. त्यावर संपर्क केला असता, आम्ही संध्याकाळपर्यंत घरी येवू असे सांगून फोन बंद केला. मात्र दुसºया दिवसापर्यंत त्या परत घरी न आल्यामुळे त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे रबाळे एमआयडीसी हद्दीतून तीन मुलींचे अपहरण झाले आहे. १४ ते १७ वयोगटातील या मुली असून त्यापैकी काही जणी पालिका शाळेत शिकणाºया आहेत. शाळेसाठी अथवा सत्संगाच्या बहाण्याने घराबाहेर गेल्यानंतर त्या परत घरी आलेल्या नाहीत. यामुळे त्यांच्या अपहरणप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण, चार दिवसांतल्या घटना : फूस लावून पळवल्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 2:44 AM