नवी मुंबई : वाशी रेल्वे पोलिसांनी चार दिवसात पाच मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून चार गुन्ह्यातील मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. स्थानकात साध्या गणवेशात बंदोबस्तावर असलेल्या आरपीएफच्या जवानांमुळे देखील दोन चोरटे रंगेहात हाती लागले आहेत.
रेल्वेत मोबाईल चोरीच्या घटनांनी रेल्वे प्रवास्यांसह रेल्वे पोलिसांचा ताप वाढवला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी नियमित रेल्वे पोलिसांकडून रेल्वेत शिवाय स्थानकांमध्ये गस्त घातली जात आहे. त्यानंतरही गर्दीच्या वेळी प्रवास्यांच्या खिशातून तसेच दरवाजात उभ्या असलेल्या प्रवास्यांच्या हातातून मोबाईल हिसकावले जात आहेत. मागील चार दिवसात मोबाईल चोरीचे असे चार गुन्हे घडले होते. त्यामध्ये वाशी रेल्वे पोलिसांनी पाच चोरट्यांना अटक केली आहे.
वाशी, नेरुळ, सानपाडा हे गुन्हे घडले होते. त्या अनुशंघाने वरिष्ठ निरीक्षक संभाजी कटारे यांनी निरीक्षक सचिन गवते, उपनिरीक्षक बदाले, उपनिरीक्षक कृष्णा पाटोळे आदींचे पथक केले होते. त्यांनी स्थानकातील सीसीटीव्हीच्या मदतीने घणसोलीमधून दोघांना तर गोवंडी मधून एकाला अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेले मोबाईल देखील मिळवण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. तर नेरुळ व वाशी स्थानकात रेल्वे प्रवास्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरटे पळत असतानाच आरडा ओरडा झाला.
यावेळी दोन्ही ठिकाणी साध्या गणवेशात असलेल्या आरपीएफ जवानांनी तात्काळ त्यांना अटकाव घातला. यामुळे दोन चोरटे रंगेहात हाती लागले असता झडतीमध्ये त्यांच्याकडे चोरीचे मोबाईल मिळून आले. रेल्वे पोलिसांनी चार दिवसात या पाच मोबाईल चोरट्यांना अटक केल्याने काही प्रमाणात रेल्वेतल्या मोबाईल चोरीला आळा बसेल अशी अपेक्षा रेल्वे प्रवास्यांकडून व्यक्त होत आहे.