नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३१ मार्च २०२३ अखेर विविध संस्थांच्या पाच प्राथमिक शाळा शासनाची आणि नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता बेकायदेशीरपणे सुरु आहेत. आर.टी.ई. अधिनियमानुसार कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही. याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या स्वाक्षरीने जाहीर प्रकटन प्रसिध्द केले असून या शाळा तात्काळ बंद करण्याचे जाहीर केले आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहरात बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या शाळांची यादी दरवर्षी जाहीर करून या शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश न घेण्याचे आवाहन देखील महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येते. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होणार असून ३१ मार्च २०२३ पर्यंत शहरात पाच शाळा बेकादशीरपणे सुरु असलयाचे महापालिकेने जाहीर केले आहे.
यामध्ये इस्माइल एज्युकेशन ट्रस्ट मुंबई या संस्थेची सीबीडी सेक्टर ८ आर्टिस्ट व्हिलेज येथील इंग्रजी अल मोमीन स्कुल, ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट मुंबई या संस्थेची नेरुळ सेक्टर २७ मधील इंग्रजी माध्यमाची शाळा इकरा ईस्लामिक स्कुल ॲण्ड मक्तब, द आटपाडी एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे सीवूड सेक्टर ४० मधील इंग्रजी माध्यमाचे द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुल, ज्ञानदिप शिक्षण प्रसारक मंडळ ठाणे या संस्थेचे घणसोली येथील सरस्वती विद्यानिकेतन स्कुल न्याय प्रविष्ठ आहे. तर इलिम फुल गोस्पेल ट्रस्ट ऐरोली या संस्थेचे रबाळे येथील इलिम इंग्लिश स्कुल या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन महापलिकच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या महापालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे आणि परवानगी शिवाय सुरू केलेली शाळा तात्काळ बंद करावी, अन्यथा संबंधितांवर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार कारवाईचा इशारा महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत देण्यात आला आहे. या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत. ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजीकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा. जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.