पनवेल परिसरात डेंग्यूचे २२ संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 02:01 AM2019-07-30T02:01:55+5:302019-07-30T02:02:10+5:30
स्वाइन फ्ल्यूचा रुग्ण दगावला : साथीचे आजार बळावण्याची शक्यता
वैभव गायकर
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात साथीच्या आजारांचा धोका बळावला आहे. कामोठे सेक्टर १७ मधील रहिवासी नाना सहाणे यांचा स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्याने पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात डेंग्यू, मलेरिया सोबत स्वाइन फ्ल्यूचा धोका निर्माण झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार पनवेल महापालिका क्षेत्रात २२ डेंग्यू तर नऊ मलेरियाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. मात्र, महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयांत दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येनुसार हा आकडा १०० पेक्षा जास्त आहे. मागील चार दिवसांपासून मुसळधार पावसाने पनवेलमध्ये जोरदार हजेरी लावली. पावसाने उसंत घेतल्यानंतर साथीचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी गाढी नदीला आलेल्या पुरामुळे पनवेल शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. विशेषत: गाढी नदीकिनाऱ्यावरील लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला होता. त्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता असल्याने महापालिकेने या ठिकाणी त्वरित धुरीकरण व फवारणी करणे गरजेचे आहे.
सध्याच्या घडीला पनवेल शहरात सर्वात जास्त डेंग्यूचे संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यानंतर कळंबोली, खारघर, नवीन पनवेल या ठिकाणीदेखील डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या मोठी आहे. या व्यतिरिक्त ग्रामीण भागात साथीचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डेंग्यू विषाणूजन्य आजार आहे. एडीस इजिप्ती डासाच्या चावण्याने हा आजार होतो. आजारावर वेळीस उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. मात्र, दुर्लक्ष केल्यास प्राणही गमवावा लागू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. सध्या अनेक भागांत दूषित, गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पोटांच्या आजारांचे विकारदेखील वाढत आहेत. गॅस्ट्रो, कॉलरा व कावीळ या रुग्णांची संख्याही वाढत आहे.
स्वाइन फ्ल्यूने दगावलेल्या रुग्णाबाबत आरोग्य विभाग अनभिज्ञ
साथीच्या आजारांबरोबर स्वाइन फ्ल्यूचा धोकादेखील शहरात बळावला आहे. रुग्णाच्या नाकातील व घशातील स्राव, घाम, थुंकीमधून स्वाइन फ्ल्यूच्या विषाणूंचा प्रसार होतो. स्वाइन फ्ल्यूचे विषाणू हे हवेत साधारणत: आठ तास जिवंत असतात. सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रात एकूण सहा नागरी आरोग्य केंद्र आहेत. खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, कामोठे या ठिकाणी प्रत्येक एक व पनवेल शहरात दोन नागरी आरोग्य केंद्राचा समावेश आहे. या केंद्रात रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जातात. तर एक ग्रामीण रुग्णालय आहे. शहराच्या तुलनेत अद्ययावत सरकारी आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. महापालिकेकडून दरवर्षी साथीचे आजार निर्मूलनासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली जाते. मात्र, प्रत्याक्षात धुरीकरण व फवारणी वेळेवर होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्वाइन फ्ल्यूचे कामोठे शहरात दोन रुग्ण असल्याची माहिती नगरसेवक डॉ. अरुण भगत यांनी १६ जुलै रोजी पालिकेला लिहिलेल्या पत्रात दिली होती. यापैकी नाना बजाबा सहाणे यांचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आणखी एक रुग्ण परशुराम कानू गायकवाड यांच्यावर खांदा वसाहतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णाला मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. भगत यांनी पालिकेला दिली असूनही पत्राची दखल घेतली गेली नाही. कामोठे शहरात स्वाइन फ्ल्यूने रुग्ण दगावल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रज्ञा नरावडे यांच्याकडे उपलब्ध नाही.
साथीचे आजाराची लागण टाळण्यासाठी नागरिकांनी बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. उकळलेले पाणी प्यावे, तसेच गर्दीच्या ठिकाणी जावे टाळावे. घराजवळ पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी प्राथमिक उपचारासाठी पालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
- डॉ. प्रज्ञा नरावडे,
वैद्यकीय अधिकारी,
पनवेल महापालिका