शहरात पाच हजार ट्रकचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:45 AM2018-07-22T00:45:35+5:302018-07-22T00:46:09+5:30
अवजड वाहतूक बंद; कृषी मालाच्या आवक-जावकवरही परिणाम
नवी मुंबई : वाहतूकदारांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी नवी मुंबई-पनवेलमधील अवजड वाहतुकीवर परिणाम झाला होता. एपीएमसीच्या ट्रक टर्मिनल व परिसरामध्ये पाच हजारांपेक्षा जास्त ट्रक उभे होते. कृषी मालाच्या आवक व जावकवरही परिणाम झाला आहे.
प्रलंबित मागण्यांसाठी वाहतूकदारांनी सुरू केलेल्या संपाला प्रतिसाद मिळू लागला आहे. स्कूलबस व छोटे वाहतूकदार संपात सहभागी नसले तरी अवजड वाहतूकदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. नवी मुंबईमधील ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी दुसºया दिवशीही ट्रकमध्ये माल भरले नाहीत. एमआयडीसीमधील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. देशाच्या विविध भागातून आलेल्या ट्रक एपीएमसीच्या वाहनतळावर व परिसरामध्ये उभे करण्यात आले आहेत. वाहतूकदार संघटनांनीही शहरभर फिरून संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. संपामधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाºयांना वगळण्यात आले आहे. यानंतरही अनेक वाहतूकदारांनी संपात सहभागी होणे पसंत केले आहे. शुक्रवारच्या तुलनेमध्ये आवक घटली आहे. संप सुरूच राहिला तर सोमवारी आवक व जावकवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.