सिकंदर अनवारे, दासगावलघुपाटबंधारे विभागाच्या मालकीचे रायगडच्या पायथ्याशी महाड तालुक्यात कोथुर्डे धरण आहे. या धरणावर १९ गावे आणि महाड नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. महाड नगरपालिका पाइपलाइनद्वारे थेट पाणी धरणातून उचलते, तर १९ गावांना गांधारी नदीद्वारे पाणीपुरवठा होतो. यामुळे नगरपालिकेद्वारे पाणीटंचाईच्या काळात थोडे का होईना पाणी मिळते. मात्र ग्रामीण भागातील काही गावांना पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही. सध्या धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने धरणातून सोडण्यात येणारे पाणी गांधारी नदी कोरडी झाल्याने शेवटच्या टोकाला असलेल्या पाच गावांच्या जॅकवेलपर्यंत पोहोचत नाही. यामुळे या गावांची नळपाणी पुरवठा योजना ठप्प झाली आहे. तसेच सध्या या गावांच्या विहिरी कोरड्या पडल्या असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. कोथुुर्डे धरणाच्या पाण्यावर १९ गावे व महाड नगरपालिकेची नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. दरवर्षी हे धरण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच आटते. मात्र या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली १९ पैकी काहीच गावांना याचा दरवर्षीच फटका बसतो. मात्र या पाण्यावर अवलंबून असणारी इतर गावे ठिकठिकाणी पाणी अडवून ठेवत असल्याने त्यांना फरक पडत नाही. मात्र गांधारी नदीच्या महाड शहरानजीक असलेल्या दासगाव, वहूर, केंबुर्ली, साहिलनगर, गांधारपाले या गावांना दरवर्षी याचा फटका बसतो.कोथुर्डे धरण १९७१ साली बांधण्यात आले. सुरु वातील काही प्रमाणात डागडुजी करण्यात आली. मात्र दोन वर्षापूर्वी या धरणाला भगदाड पडले होते. ही नळपाणी पुरवठा योजना ठप्प पडण्याच्या मार्गी होती. परंतु डागडुजीमुळे पुन्हा या धरणाला जिवंत करण्यात आले. या धरणाची डागडुजी जरी करण्यात आली असली तरी गेल्या ४० वर्षांमध्ये या धरणामधून गाळ काढण्याचे काम करण्यात आलेले नाही. या धरणामध्ये पाणी साठवण क्षमता २.७२० द. ल. घनमीटर एवढी आहे. या साचलेल्या गाळामुळे काही प्रमाणात पाण्याची पातळी कमी झाली आहे. तरी या धरणामध्ये असणारा पाण्याचा साठा १९ गावे व महाड नगरपालिकेला वर्षभर पुरेल एवढा आहे.धरणातून सोडण्यात येणारे पाणी हे गांधारी नदीला सोडले जाते. १३ किमी अंतरावर या गांधारी नदीवर सर्व १९ गावांच्या जॅकवेल आहेत व या जॅकवेलद्वारे ठिकठिकाणी नदीतून पाणी उचलले जाते. या धरणामध्ये पाण्याचा साठा मुबलक असला तरी नदी कोरडी झाल्यानंतर या नदीला सोडण्यात येणारे धरणाचे पाणी जमिनीमध्ये झिरपते व त्याचा फटका महाड शहरानजीक धरणापासून १३ किमी अंतरावर असलेल्या गावांच्या जॅकवेलला बसतो. या जॅकवेलला धरणातून सोडण्यात आलेले पाणी आठ-दहा दिवस पोहचत नाही. परिणामी या गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प होते. महाड नगरपालिका पूर्वी याच नदीमधून जॅकवेलद्वारे पाणी उचलत होती. मात्र पाण्याची कमरतात पाहता थेट धरणातून पाइपलाइनने शहराला पाणीपुरवठा केल्याने शेवटच्या क्षणी देखील महाड नगरपालिकेला या धरणातून काही प्रमाणात का होईना पाणी मिळते.जॅकवेलला पाइपलाइन जोडली तर पाण्याची बचत होणे शक्य१धरणातून सोडण्यात येणारे पाणी १३ कि मी अंतरावर असलेल्या ५ गावांच्या जॅकवेलपर्यंत येईपर्यंत ठिकठिकाणी अडले जाते. इतर गावांच्या जॅकवेल यामध्ये अनेक ठिकाणी असल्याने त्या त्या गावांनी आपली नळपाणी पुरवठा योजना सुरू राहण्यासाठी ठिकठिकाणी जॅकवेलजवळ बंधारे बांधले आहेत. २तसेच या गांधारी नदीवर अनेक वीटभट्टी व्यावसायिक असून त्यांनी देखील हे पाणी अडवले आहे. त्यामुळे धरणातून सुटणाऱ्या पाण्याचे क्षेत्र पुढे वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण देखील वाढते. पाणी जमिनीत मुरते. बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणात वाया जाते. दोन्ही कारणामुळे या महाड शहरानजीक असलेल्या ५ गावांची नळपाणी पुरवठा योजना ठप्प झाली आहे. ३लघु पाटबंधारे विभागाच्या म्हणण्यानुसार अशी अनेक कारणे आहेत की ज्यांच्यामुळे सोडण्यात येणारे धरणाचे पाणी जवळपास ७० टक्के पाणी वाया जात आहे. या वाया जाणाऱ्या पाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी याला एकच उपाय ज्या पद्धतीत महाड नगरपालिकेने थेट धरणातून पाइपलाइन आणली आहे त्याच पद्धतीत या १९ गावांच्या जॅकवेलला थेट पाइपलाइन जोडल्यास पाणी वायाही जाणार नाही व या येणाऱ्या गावांना टंचाई निर्माण होणार नाही. उलट या धरणामध्ये पाणी शिल्लक राहील.
‘कोथुर्डे’वरील पाच गावांना पाणीटंचाईची झळ
By admin | Published: April 19, 2017 12:41 AM