पाच वर्षे सलग २५० रविवारी केली दुर्गभ्रमंती, पाच राज्यांमधील किल्ल्यांचा अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 11:49 PM2020-10-31T23:49:20+5:302020-10-31T23:49:59+5:30
forts : दुर्गसंवर्धन चळवळीत सह्याद्री प्रतिष्ठानचे योगदानही महत्त्वाचे आहे. श्रमिक गोजमगुंडे यांनी स्थापन केलेली ही संस्था राज्यातील ३६ जिल्ह्यांतील विविध गड, किल्ल्यांवर संवर्धनाचे काम करत आहे. गणेश रघुवीर संवर्धन विभागाचे अध्यक्षपद सांभाळत आहेत.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : महाराष्ट्राच्या गड, किल्ल्यांचे वैभव जपण्यासाठी व त्यांचे संवर्धन करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था १५ वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेच्या गडसंवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी पाच वर्षांत सलग २५० रविवारी दुर्गभ्रमंती करून तरुणांसमोर आदर्श निर्माण केला असून, संवर्धन मोहिमेचे चळवळीत रूपांतर केले आहे.
दुर्गसंवर्धन चळवळीत सह्याद्री प्रतिष्ठानचे योगदानही महत्त्वाचे आहे. श्रमिक गोजमगुंडे यांनी स्थापन केलेली ही संस्था राज्यातील ३६ जिल्ह्यांतील विविध गड, किल्ल्यांवर संवर्धनाचे काम करत आहे. गणेश रघुवीर संवर्धन विभागाचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. महाविद्यालयीन जीवनात दुर्गभ्रमंतीची आवड निर्माण झाली व सह्याद्री प्रतिष्ठानशी संपर्क आल्यानंतर, या आवडीचे ध्येयामध्ये रूपांतर निर्माण झाले. २०१६ मध्ये प्रत्येक रविवारी दुर्गभ्रमंती करण्यास सुरुवात केली. काही वेळेला रविवारला लागून इतर दिवशीही भ्रमंती सुरू झाली. पाच वर्षांमध्ये सलग २५० रविवारी भटकंती सुरू आहे. गणेश यांनी सन २००९ पासून आतापर्यंत १,११२ किल्ले पाहिले आहेत. यामधील ८०० पेक्षा जास्त किल्ले पाच वर्षांमध्ये पाहिले आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडूमधील गडकिल्ल्यांचाही अभ्यास केला आहे.
गड, किल्ल्यांचा सखोल अभ्यास हा या भटकंतीमागील मुख्य उद्देश. पुरातन बांधकामांचा अभ्यास करणे, गडाची सद्यस्थिती पाहून तेथे संवर्धन मोहीम सुरू करणे, गडावरील तोफांची लांबी, रुंदी व इतर तपशीलाच्या नोंदी ठेवणे, गडावरील पुरातन अवशेष, शिलालेख व इतर गोष्टींचा अभ्यास करण्यास प्राधान्य दिले आहे. भटकंतीमधून आलेल्या अनुभवातून दुर्गसंवर्धन मोहिमेत सहभागी झालेल्या शिलेदारांना मार्गदर्शन केले जात आहे. गड कसा पाहावा, नोंदी कशा ठेवाव्या, पाठपुरावा कशा प्रकारे केला जावा, याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. भ्रमंती करत असतानाच संवर्धन मोहिमांवर लक्ष केंद्रित केले असून, सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक हजारापेक्षा जास्त संवर्धन मोहिमा राबविण्यास यश आले आहे. १० जानेवारी, २०१६ला तालुक्यातील ढाक बहिरी गडावरून भ्रमंती अभियानास सुरुवात केली होती. २० ऑक्टोबर, २०२०ला पाच वर्षांनंतर २५०व्या रविवारी पुन्हा ढाक बहिरी गडावरच भ्रमंतीचे आयोजन केले होते. हा समारोप नाही. भविष्यात ही दुर्गभ्रमंती व संवर्धन अभियान अखंड सुरू राहणार असल्याचा विश्वास गणेश रघुवीर यांनी व्यक्त केला
आहे.
महाविद्यालयीन जीवनापासून दुर्गभ्रमंतीची आवड निर्माण झाली. सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गसंवर्धनाचे काम सुरू आहे. गड, किल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक रविवारी भ्रमंती सुरू केली, पाच वर्षांत २५० रविवार पूर्ण झाले. या कालावधीत पाच राज्यांमधील गड, किल्ल्यांचा अभ्यास करता आल्याचा आनंद असून, या अनुभवाचा भविष्यात गड संवर्धनासाठी वापर केला जाईल.
- गणेश रघुवीर, अध्यक्ष
सह्याद्री प्रतिष्ठान, गड संवर्धन विभाग