धान्य मार्केटमधील समस्या सोडवा, व्यापाऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:53 PM2019-05-29T23:53:26+5:302019-05-29T23:54:05+5:30
बाजार समितीच्या धान्य मार्केटमधील समस्या सोडविण्यासाठी ग्रोमा संघटनेने प्रशासनासोबत बैठकीचे आयोजन केले होते.
नवी मुंबई : बाजार समितीच्या धान्य मार्केटमधील समस्या सोडविण्यासाठी ग्रोमा संघटनेने प्रशासनासोबत बैठकीचे आयोजन केले होते. मार्केटमधील प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
एपीएमसीला सर्वाधिक उत्पन्न धान्य मार्केटमधून मिळत आहे; परंतु येथील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी ग्रोमा संघटना, शिवसेना उपनेते विजय नाहटा व बाजार समिती प्रशासन यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. मार्केटमधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात यावी. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. पाणी, रस्ते, वीज व गटाराची समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी या वेळी व्यापाऱ्यांनी केली. प्रशासन सतीश सोनी यांनी सांगितले की, रोड बनविण्याचे १३ कोटींचे काम सुरू आहे. प्रशासनाला दहा लाख रुपयांच्या आतमध्ये खर्च करण्याचा अधिकार आहे. या मर्यादेत राहून जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे या वेळी सांगण्यात आले. विजय नाहटा यांनीही प्रशासनाला प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या. सीसीटीव्ही बसविण्यासाठी खासदार निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. पाणीसमस्या सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासनही दिले.
बाजार समितीमध्ये झालेल्या या बैठकीला ग्रोमाचे अध्यक्ष शरद मारू, बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी, सचिव अनिल चव्हाण व ग्रोमाचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते.