पालिकेसमोरील ध्वज पावसामुळे उतरविला
By admin | Published: July 9, 2015 01:10 AM2015-07-09T01:10:28+5:302015-07-09T01:10:28+5:30
महापालिका मुख्यालयासमोर २२५ फूट उंचावर चोवीस तास फडकणारा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. परंतु पाऊस व वाऱ्यामुळे ध्वज फाटण्याचे प्रकार वाढले.
नवी मुंबई : महापालिका मुख्यालयासमोर २२५ फूट उंचावर चोवीस तास फडकणारा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. परंतु पाऊस व वाऱ्यामुळे ध्वज फाटण्याचे प्रकार वाढले. परिणामी १५ दिवसांपासून हा ध्वज उतरविण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने पामबीच रोडवर भव्य मुख्यालय उभारल्यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीने २२५ फूट उंच राष्ट्रध्वज उभारला आहे. पामबीच रोडवरून जाताना हा राष्ट्रध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पाऊस व वाऱ्यामुळे मागील काही दिवसांपासून ध्वज फाटण्याचे प्रकार घडत होते. यामुळे १५ दिवसांपासून राष्ट्रध्वज उतरविण्यात आला आहे. ध्वजाची रशी दुरुस्त करण्याचे कामही सुरू आहे. यामुळे पावसाळा संपेपर्यंत ध्वज लावण्यात येण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जाते. ध्वज दिसत नसल्यामुळे अनेक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, पाऊस व इतर वेळी ध्वज उतरविण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेण्यात आली असून लवकरच तो पुन्हा लावण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)