शहरवासीयांना फ्लेमिंगोंची भुरळ, २५ हजारांपेक्षा जास्त फ्लेमिंगो खाडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 02:27 AM2018-06-03T02:27:07+5:302018-06-03T02:27:07+5:30

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईमधील जैवविविधतेमध्येही वाढ होऊ लागली आहे. मनपा क्षेत्रामध्ये तब्बल १६८ प्रकारचे पक्षी आढळून आले आहेत.

 Fleming's love for the city dwellers, over 25 thousand Flamingos bay | शहरवासीयांना फ्लेमिंगोंची भुरळ, २५ हजारांपेक्षा जास्त फ्लेमिंगो खाडीत

शहरवासीयांना फ्लेमिंगोंची भुरळ, २५ हजारांपेक्षा जास्त फ्लेमिंगो खाडीत

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईमधील जैवविविधतेमध्येही वाढ होऊ लागली आहे. मनपा क्षेत्रामध्ये तब्बल १६८ प्रकारचे पक्षी आढळून आले आहेत. सद्यस्थितीमध्ये दिवा ते दिवाळेपर्यंतच्या खाडीमध्ये तब्बल २५ हजारांपेक्षा जास्त फ्लेमिंगो दाखल झाले असून, पर्यावरणप्रेमींसाठी पक्षिनिरीक्षणाची पर्वणी ठरत आहे.
नवी मुंबईला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. दिघा ते बेलापूरपर्यंत एक बाजूला डोंगररांगा असून, दुसºया बाजूला दिवा ते दिवाळेपर्यंत २२ किलोमीटरचा खाडीकिनारा लाभला आहे. तब्बल १४७५ हेक्टर जमिनीवर कांदळवन घोषित केले असून, उर्वरित २७४ हेक्टरवरील कांदळवनावर अद्याप संरक्षित वने म्हणून घोषित करण्याचे शिल्लक आहे.
कांदळवनासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येऊ लागली आहे. तब्बल १६८ प्रकारचे पक्षी या परिसरामध्ये आढळून येत आहेत. याशिवाय ८० प्रकारचे सरपटणारे आणि उभयचर प्राणी, १४० प्रकारची फुलपाखरे, १२५ प्रकारचे मत्स्य जीव आढळतात. या परिसरातील बहुतांश पक्षी स्थलांतरित आहेत. नेरुळ परिसरातील खाडीकिनाºयावरील तलाव व ऐरोलीसह घणसोली परिसरातील मातीचे बांधदेखील विशिष्ट पक्ष्यांसाठी घरोब्याचे ठिकाण बनले आहे. ७७ प्रकारचे ३५ फॅमिली आणि १४ आॅर्डरशी निगडित असलेले पक्षी उरणपर्यंतच्या खाडीत आढळून येतात. या परिसरामध्ये आढळून येणाºया पक्ष्यांच्या विविध जातींमध्ये ४८ टक्के स्थानिक, स्थानिक स्थलांतर करणारे २३ टक्के व पूर्ण स्थलांतर करणारे २९ टक्के पक्षी आहेत.
नवी मुंबईमध्ये नोव्हेंबर ते जून दरम्यान फ्लेमिंगोंचे मोठ्या प्रमाणात आगमन होत असते. सद्यस्थितीमध्ये २५ हजारांपेक्षा जास्त फ्लेमिंगो या परिसरामध्ये दाखल झाले आहेत. एनआरआय कॉम्प्लेक्समागील तलाव व टी. एस. चाणक्यच्या मागील बाजूला फ्लेमिंगोंचे थवे पाहावयास मिळत आहेत.
राज्य शासनाने हा परिसर फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केला आहे. मुंबईसह राज्यातून पक्षिनिरीक्षक या परिसरामध्ये अभ्यासासाठी येत आहेत. पक्षिप्रेमी पर्यटकही गर्दी करू लागले आहेत. ऐरोलीमधील जैवविविधता केंद्राच्या वतीने पक्षी पाहण्यासाठी बोटही उपलब्ध करून दिली जात आहे. पामबिच रोडवरून जाताना फ्लेमिंगो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या परिसरामध्ये पूर्वी विदेशातून फ्लेमिंगो यायचे; परंतु आता नोव्हेंबर ते जून दरम्यान नवी मुंबई, उरण व शिवडी खाडीत मुक्काम करून हे पक्षी इतर कालावधीमध्ये गुजरात व इतर ठिकाणी स्थलांतर करत आहेत.

निरीक्षणासाठी
सुविधा नाही
- राज्य शासनाने नवी मुंबईतील खाडीकिनारा फ्लेमिंगो अभयारण्य घोषित केले आहे.
- सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षी या परिसरामध्ये दाखल झाले आहेत; पण पक्षिनिरीक्षकांसाठी काहीही सुविधा नाहीत.
- टी. एस. चाणक्य परिसरामध्ये अनेक हौशी पर्यटक पक्षी पकडण्याचाही प्रयत्न करत आहेत. पक्ष्यांना हुसकावण्याचे प्रयत्नही सुरू असून अशीच स्थिती राहिली, तर भविष्यात या परिसरामध्ये पक्ष्यांचे आगमन कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई व मुंबई परिसरामध्ये १९९४पासून फ्लेमिंगोंचे आगमन होत आहे. लेझर व ग्रेटर फ्लेमिंगोच्या जाती या परिसरामध्ये पाहावयास मिळत आहेत; पण फ्लेमिंगोंच्या सुरक्षिततेसाठी फारशी दखल घेतलेली नाही. वनविभाग, शासन व मनपानेही यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात.
- विजय शिंदे,
पक्षिनिरीक्षक

Web Title:  Fleming's love for the city dwellers, over 25 thousand Flamingos bay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.