सिडकोच्या भूखंडांची कोटींची उड्डाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 10:09 AM2023-08-06T10:09:26+5:302023-08-06T10:09:32+5:30
भूखंडविक्री हे सिडकोच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे. चालू आर्थिक वर्षात भूखंड विक्रीतून ४७०० कोटी रुपयांचा महसूल सिडकोने अपेक्षित धरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सिडकोच्या भूखंडांना विकासक आणि गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे दक्षिण नवी मुंबईतील भूखंडांनीसुद्धा कोटींची उड्डाणे घेतली आहेत.
या विभागातील विक्रीस काढलेल्या ३० भूखंडांच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत सुमारे १४०० कोटींची भर पडणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच खारघर येथील एक भूखंडाला प्रतिचौरस मीटरला ३ लाख ७६ हजार ३९९ रुपयांचा दर प्राप्त झाला आहे. त्यामुळे सिडकोच्या पणन विभागाचा हुरूप वाढला आहे.
भूखंडविक्री हे सिडकोच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे. चालू आर्थिक वर्षात भूखंड विक्रीतून ४७०० कोटी रुपयांचा महसूल सिडकोने अपेक्षित धरला आहे. त्यानुसार विविध नोडमधील लहानमोठ्या आकाराच्या भूखंड विक्रीचा सिडकोने धडाका लावला आहे. याअंतर्गत आतापर्यंत भूखंड विक्रीच्या ३२ योजना जाहीर केल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी भूखंडविक्री योजना-३५ द्वारे खारघर, पनवेल (पूर्व व पश्चिम), कामोठे, कळंबोली, द्रौणागिरी येथील विविध आकारमानाचे ३८ भूखंड निविदेद्वारे विक्रीस काढले होते. सिडकोच्या या भूखंड विक्री योजनेस विकासकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
प्रति चौरस मीटरला लाखाचे मोल
खारघर सेक्टर-११ येथील भूखंड क्रमांक १०३ या ३६४६ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडास सर्वाधिक बोली प्रति चौरस मीटर ३ लाख ७६ हजार ३९९ रुपयांची लागली आहे. तसेच खारघरच्या याच परिसरातील इतर तीन भूखंडांनासुद्धा प्रतिचौरस मीटरला लाखांच्या वरती दर प्राप्त झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी नेरूळमधील एक भूखंड प्रतिचौरस मीटर ६ लाख ७२ हजार ६५१ रुपये दराने विकला गेला आहे.