जकात नाक्याजवळ उभारा बस टर्मिनस : मंदा म्हात्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:18 AM2017-08-04T02:18:50+5:302017-08-04T02:18:50+5:30
वाशी जकात नाक्याच्या मोकळ्या जागेवर अत्याधुनिक दर्जाचे बस टर्मिनस उभारावे, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.
नवी मुंबई : वाशी जकात नाक्याच्या मोकळ्या जागेवर अत्याधुनिक दर्जाचे बस टर्मिनस उभारावे, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे महामार्गावर उभ्या असणाºया बसेसना चाप बसेल आणि मोकळ्या जागेवरील संभाव्य अतिक्रमणाला आळा घालता येईल, असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने कर आकारणीच्या सुधारित धोरणाचा अवलंब केल्यानंतर राज्यातील सर्व जकात नाके बंद करण्यात आले आहे. नवी मुंबई व मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला वाशी जकात नाकाही बंद झाला आहे. त्यामुळे जकात नाक्याची जवळपास चार एक जागा रिकामी झाली आहे. ही मोकळी जागा वेळीच संरक्षित न केल्यास त्यावर अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. सायन-पनवेल महामार्गावरून खासगी प्रवासी बसेससह विविध राज्यातील बसेसच्या दररोज शेकडो फेºया होतात. या बसेसना निश्चित थांबे नसल्याने महामार्गावरच प्रवाशांना उतरविले जाते व नवीन प्रवासी घेतले जातात. विशेषत: संध्याकाळच्या वेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात या बसेस उभ्या असल्याचे दिसून येते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. वाशी जकात नाक्याच्या मोकळ्या झालेल्या भूखंडांवर अत्याधुनिक दर्जाचे बस टर्मिनस उभारल्यास मुंबई, नवी मुंबईसह परराज्यातून येणाºया प्रवाशांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. तसेच या भूखंडांवरील संभाव्य अतिक्रमण टाळता येईल, अशी आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी आहे.