खारफुटीमुळे सीबीडीला पुराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 11:18 PM2020-06-21T23:18:16+5:302020-06-21T23:18:27+5:30
या वर्षीही सफाई न झाल्याने सीबीडी विभागात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
योगेश पिंगळे
नवी मुंबई : गेली अनेक वर्षे सफाई न झाल्याने सीबीडीतील होल्डिंग पाँडमध्ये खारफुटीची बेसुमार वाढ झाली आहे. त्यात होल्डिंग पाँड भागात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने गेल्या काही वर्षांपासून सीबीडीतील पावसाळी पाण्याचा निचरा होण्यात अडचणी येत आहेत. या वर्षीही सफाई न झाल्याने सीबीडी विभागात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई शहराची भौगोलिक रचना ही किनारपट्टीपासून खाली आहे. त्यामुळे या शहराची निर्मिती करताना, मुसळधार पावसात मुंबईप्रमाणे शहरात पाणी शिरू नये, यासाठी काय करता येईल, याचा सिडकोने सविस्तर अभ्यास केला होता. यानंतर, नवी मुंबई शहरात सुमारे ११ ठिकाणांच्या खाडी किनाऱ्याजवळ होल्डिंग पाँड तयार तयार करण्यात आले होते. या पाँडच्या मुखावर मोठे दरवाजे उभे करण्यात आले. भरतीच्या काळात खाडीचे पाणी शहरात शिरणार नाही आणि पावसाचे पाणी पाँडमध्ये जमा होईल, अशा पद्धतीने दरवाजांची रचना करण्यात आली होती. आहोटी सुरू होताच, पाँडमध्ये जमा झालेल्या पाण्याचा दाब वाढेल आणि दरवाजे आपोआप उघडून, त्यातील पाणी आपोआप खाडीत जाईल, अशी या पाँडची रचना करण्यात आली होती. त्यामुळेच २६ जुलैच्या मुसळधार पावसातही होल्डिंग पाँडमुळे अवघ्या काही तासांत नवी मुंबईतील पावसाच्या पाण्याचा निचरा लगेच झाला होता.
या पाँडमध्ये गेल्या काही वर्षांत गाळ मोठ्या प्रमाणावर साचला असून, त्याची स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी खारफुटीची जंगले उभी राहिली आहेत.
सीबीडी विभागातील पाण्याचा निचरा होणाºया ठिकाणी सेक्टर १३ येथे मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. या होल्डिंग पाँडमध्ये सीबीडी विभागातील सेक्टर १, १ ए, २, ३, ४, ५, ६, ९, ९ एन आदी सेक्टरमध्ये जमा होणारे पावसाचे पाणी, तसेच सीबीडीतील डोंगरावरील काही प्रमाणात पावसाचे पाणी वाहून जाते. सीबीडी येथील सायन-पनवेल महामार्गाजवळून होल्डिंग
पाँडकडे वाहून जाणाºया पाण्याच्या मार्गाचीही स्वच्छता करण्यात
आलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
>होल्डिंग पाँडची निर्मिती शहरच्या रक्षणाकरिता करण्यात आली होती, परंतु त्यांची स्वच्छता होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून, खारफुटी वाढलेली आहे. गेल्या दहा वर्षांपासून होल्डिंग पाँडची स्वच्छता करण्यासाठी महासभा, स्थायी समिती सभेत आवाज उठविला होता, परंतु अधिकाऱ्यांनी याकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याने सीबीडी विभागात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- डॉ. जयाजी नाथ
माजी नगरसेवक