होल्डिंग पाँडमधील अडथळ्यांमुळे नवी मुंबई शहराला पुराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:20 PM2020-09-29T23:20:16+5:302020-09-29T23:20:48+5:30
गाळाचे साम्राज्य : बेसुमार खारफुटी; अतिवृष्टीत शहरात पाणी
योगेश पिंगळे ।
नवी मुुंबई : शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी होल्डिंग पाँडची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या होल्डिंग पाँडमध्ये गाळाचे साम्राज्य वाढले असून, खारफुटी बेसुमार वाढली आहे. त्यामुळे शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा होताना विविध अडथळे येत असून, अतिवृष्टीत शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे.
मुसळधार पावसात मुंबईप्रमाणे शहरात पाणी शिरू नये, यासाठी सिडकोने सविस्तर अभ्यास करून शहरात विविध ठिकाणी ११ ठिकाणच्या खाडीकिनाऱ्याजवळ होल्डिंग पाँड तयार तयार केले होते. ओहोटी सुरू होताच पाँडमध्ये जमा झालेल्या पाण्याचा दाब वाढेल आणि दरवाजे आपोआप उघडून त्यातील पाणी आपोआप खाडीत जाईल, अशी या पाँडची रचना करण्यात आली होती. शहरात पडणारा पाऊस पाहता, महापालिकेच्या माध्यमातून पाण्याचा निचरा अधिक होण्यासाठी या होल्डिंग पाँडची क्षमता वाढवून १५० मिमी करण्यात आली होती. या पाँडमध्ये गेल्या काही वर्षांत गाळ मोठ्या प्रमाणावर साचला आहे. तसेच खारफुटीची जंगले उभी राहिली आहेत. होल्डिंग पाँडमधील पाणी उपसण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून पंप बसविण्यात आल्या आहेत, परंतु गाळ साचल्याने अनेक अडचणी येत आहेत. गाळ काढण्यासाठी पालिकेकडून अद्याप परवानगी न मिळाल्याने काम प्रलंबित आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहत आहे. सीबीडी विभागातील सेक्टर १, १ ए, २, ३, ४, ५, ६, ९, ९ एन आदी सेक्टरमध्ये जमा होणारे पावसाचे पाणी, तसेच सीबीडीतील डोंगरावरील काही प्रमाणात पावसाचे पाणी सीबीडी सेक्टर १३ येथील होल्डिंग पाँडमध्ये वाहून जाते.हा गाळ, बेसुमार वाढलेली खारफुटी, यामुळे २२ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसात सीबीडी येथील नागरी वसाहती आणि बाजारपेठेत पाणी शिरून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. होल्डिंग पाँडमधील गाळ काढला न गेल्यास, अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे.
शहरातील होल्डिंग पाँडमधील गाळ काढण्यासाठी परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. सीबीडी आणि वाशी येथील होल्डिंग पाँडजवळ पावसाळी उदंचन केंद्र नव्याने बांधण्याचे प्रस्तावित आहे. गेल्या आठ महिन्यांत याबाबत टेंडर काढण्यात आले आहे, परंतु प्रतिसाद मिळालेला नाही.
-सुरेंद्र पाटील (शहर अभियंता, न.मुं.म.पा.)